माघी गणेशोत्सवानिमित्त पेणनगरी पुन्हा बाप्पामय

हजारो मूर्तींची निर्मिती
| हमरापूर | वार्ताहर |
भाद्रपद असो वा साखरचौथ किंवा माघी गणेशोत्सव.या काळात पेण तालुक्यातील गणेशमुर्ती कारखान्यांमध्ये विविध आकर्षक बाप्पांची निर्मिती होत राहते. त्यामुळे अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या माघी गणेशोत्सवासाठी पेणनगरी पुन्हा बाप्पामय झालेली आहे. माघी गणेशोत्सव सोहळा बुधवार दि. 25 जानेवारी पासून सुरू होत आहे. यादिवशी गणेश जयंती वरद विनायक चतुर्थीच्या दिवशी माघी गणरायाचे आगमन होत असून माघी गणेशोत्सवाची चाहूल लागल्याचे पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये दिसून येत आहे.

मूर्तीकारांकडे विविध आकारातील बाप्पांच्या सुबक मूर्तीची मागणी करण्यात आली आहे. पेण शहरासह हमरापूर, जोहे, तांबडशेत, कळवे, वडखळ व इतर गावांतील विविध कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तीच्या कामाला वेग आला आहे. सार्वजनिक मंडळासह खाजगी गणेशमूर्ती तयार करून त्या गणेशभक्तांना देण्यासाठी लगबग सुरू असल्याचे येथील मूतीर्र्कारांनी सांगितले.

माघ महिन्यातली विनायक, वरद, तिलकुंद चतुर्थीचा शुभयोग असून पूर्वापार गणेशमंदिरात थाटात साजरा होणारा या उत्सवाने आता गणेशभक्तांच्या हौसे मौजेखातर सार्वजनिक व खासगी अशा दोन्ही स्वरूपात माघी गणेशोत्सवाचे स्वरूप गेल्या काही वर्षात धारण केले आहे. गेल्या दशकभरात या उत्सवाची क्रेझ चांगलीच बाळसे धरत मोठे स्वरूप धारण करीत आहे सध्या माघ महिन्यात थंडी असूनसुद्धा पेणच्या गणेशमूतीर्र्कारांच्या कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तींची रंगरंगोटी करण्याकडे मोठी लगबग सुरू आहे. एक फुटापासून साधारणतः 6 फूट उंचीच्या सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या गणेशमूर्ती रंगविण्यासाठी कार्यशाळांमध्ये आणल्या जात आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या या गणेशमूर्ती कलाग्राम कळवे, जोहे, तांबडशेत, हमरापूर येथील कार्यशाळांमधून पेण शहरातील मूर्तिकार आणतात. 5 फूट उंचीच्या या भव्य गणेशमूर्ती या ठिकाणचे मूर्तिकार कच्च्या अर्थात न रंगविलेल्या गणेशमूर्ती तयार करून आणतात. फुटीच्या मोजमापानुसार त्यांची किंमत ठरलेली असते.

पुणे येथून मागणी
पुणे येथून माघी गणेशोत्सवात गणेशमूर्तींना मोठी मागणी असल्याचे कार्यशाळेतील कलाकारांनी सांगितले. गणेश मंदिरात विधिवत साजरा होणारा हा माघी गणेशोत्सव आता थेट घराघरात व सार्वजनिक सभामंडपात साजरा होतो आहे. पेण शहरासह हमरापूर भागात विविध कार्यशाळांमध्ये पुणे, ठाणे, पालघर, वसई, पनवेल, उरण, खालापूर, मावळ व नाशिक, डोंबिवली येथील ऑर्डर बुकिंग केल्याचे असून माघी गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर आला असल्याने मूर्तीकार सध्या गणेशमुर्तीचीं रंगरंगोटी, सजावट व इतर कामात गुंतले असल्याचे चित्र पहायला मिळत असून कार्यशाळांमध्ये कारागीरांची लगबग दिसून येत आहे.

Exit mobile version