गणेशमूर्तींच्या किमती महागणार; गणेशमूर्ती तयार करण्याचे काम जोरात सुरु
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
यंदा गणपती बाप्पांचे आगमन गतवर्षीच्या तुलनेत लवकर होणार आहे. रायगड जिल्ह्यातील गणेशमूर्तींचे माहेरघर असलेल्या पेणमधील सुमारे 25 हजारांहून अधिक गणेशमूर्ती विदेशात रवाना झाल्या आहेत. थायलंड, लंडन आदी देशांमध्ये या मूर्ती पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, कच्च्या मालाचे वाढते भाव, कामगारांची वाढती मजुरीमुळे यंदा मूर्तींच्या किमतीमध्ये पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती मूर्तीकारांकडून देण्यात आली आहे.
गणरायाचे आगमन यंदा सात सप्टेंबरला होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी 12 दिवस अगोदर गणराया घरोघरी येणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेणसह अन्य ठिकाणी गणेशमूर्ती तयार करण्याबरोबरच पॉलीश करणे, सोनेरी रंग लावणे, फिनिशिंग करणे, रंगकाम करणे अशा अनेक प्रकारची कामे कारखान्यांमधून सुरू केली आहेत. पेणमध्ये पाच हजारांहून अधिक लहान-मोेठे गणेशमूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या कामाला सुरुवात झाली असून, 25 हजारांहून अधिक मूर्ती तयार होऊन विदेशातदेखील पाठविण्यात आले आहेत. अलिबाग, रोह्यामध्ये गणेशमूर्ती तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. मूर्तींना पॉलीश करण्याची लगबग वाढली आहे. या कामात पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून महिलादेखील कामाला लागल्या आहेत. काही ठिकाणी गणेशमूर्ती बुकिंगलादेखील सुरुवात झाली आहे.
मात्र, गतवर्षीच्या तुलनेने यंदा मूर्तींच्या किमतीमध्ये पाच ते दहा टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती मूर्तीकार अजित लांगी यांनी दिली. यंदा दीड फुटाच्या मूर्तीची किंमत एक हजार दोनशे ते पंधराशे रुपये, दोन फुटांच्या मूर्तींची किंमत एक हजार 800 ते दोन हजार आणि तीन फुटांच्या मूर्तीची किंमत चार ते पाच हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
रामलल्ला, राम मंदिर मूर्तीला मागणी गणरायाचे आगमन होण्यास साडेतीन महिने बाकी आहेत. ग्राहकांनी मूर्ती बुकिंगलादेखील सुरुवात केली आहे. ग्राहकांना मूर्ती वेळेवर मिळावी यासाठी पेणसह वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये मूर्ती पॉलीश करणे, तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. दरवर्षी मूर्तीं खरेदीचा वेगवेगळा क्रेझ असतो. यंदा रामलल्ला आणि राम मंदिर असलेल्या गणेशमूर्तींना मागणी अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.