बापू खरमाळे काळाच्या पडद्याआड


। मुंबई । प्रतिनिधी ।
दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब या महिला संघाचे संस्थापक बापू खरमाळे यांचे सोमवारी (दि.14) अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी ते 69 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. दहा दिवसापूर्वी त्यांना जुन्नर-पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पण अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली आणि कबड्डी वर्तुळात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.

बापू हे क्रीडा शिक्षक म्हणून डॉ.शिरोडकर हायस्कुल येथे नोकरीवर रुजू झाले. त्या ठिकाणी त्यांनी कबड्डी, खो-खो व लंगडी या खेळावर लक्ष केंद्रित केले. पण परळ या भागात कबड्डी या खेळाचा जोर जास्त असल्याने कबड्डीकडे त्यांचा अधिक ओढा होता. त्यातूनच मग डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब या महिला संघाची स्थापना त्यांनी केली. भारती विधाते-भुजबळ, मनीषा गावंड-कदम, स्नेहल साळुंखे-कुदळे व मेघाली कोरगावकर-म्हसकर या श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू त्यांच्याकडे घडल्या. त्याशिवाय नयना पालांडे, सुजाता साळुंखे-काळगावकर,संगीता घाडीगांवकर, सुनीता जाधव, लता केर, तृप्ती कोचरेकर-शिवतरकर, श्रद्धा काळे ते आताची क्षितिजा हिरवे पार्‍यांच्या खेळाडू या त्याच्याकडेच उदयास आल्या. त्यांच्या या वृत्तीची दखल घेत कबड्डीमहर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांनी घेत त्यांना महाराष्ट्र महिला संघाच्या प्रशिक्षकपदी अनेकवेळा नेमणूक केली होती.

संघटनेचे अध्यक्ष अजित पवार व कार्याध्यक्ष गजानन कीर्तिकर यांनी देखील हळहळ व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली दिली. अखेर मु.पो.खोरड, ता.जुन्नर, पुणे येथील त्यांच्या मूळ गावातील स्मशानभूमीत त्यांचा मुलगा स्वप्नील यांनी अंत्यसंस्कार करून त्यांना शेवटचा निरोप दिला.

Exit mobile version