| चिरनेर | प्रतिनिधी |
खासदार श्रीरंग बारणे हे दहा वर्षे खासदार म्हणून सत्तेत आहेत. मात्र, खासदार असताना, चिरनेर गावाच्या विकासासाठी निधी आणायचा सोडाच; पण ज्यांनी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला, त्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना त्यांच्या (दि.25) सप्टेंबर या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी ते एकदाही चिरनेर गावात फिरकले नसल्याचा संताप उपसरपंच सचिन घबाडी, शेकापचे उरण पूर्व विभाग माजी चिटणीस सुरेश पाटील, माजी उपसभापती शुभांगी पाटील, तसेच अन्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. चिरनेर गावाला दरवर्षी पुराचा तडाखा बसतो. या गावाला बसणार्या महापुराच्या तडाख्यात चिरनेर ग्रामवासियांच्या घरात पाणी शिरून, अन्नधान्य तसेच मौल्यवान चीज वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. एका वर्षी तर या गावातील एका दाम्पत्याच्या राहत्या घरात पाणी शिरून पती-पत्नी मृत्युमुखी पडल्याची घटनाही या गावात घडल्याचे सचिन घबाडी यांनी सांगितले. अशा वेळीदेखील सत्तेत असणारे खासदार श्रीरंग बारणे हे चिरनेर गावातील पूरग्रस्तांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी कधीच आले नाहीत, हीदेखील चिनेरकरांसाठी चीड आणणारी गोष्ट असल्याचे घबाडी यांनी सांगितले.