बार्बोराने पटकावले विम्बल्डनचे विजेतेपद

| लंडन | वृत्तसंस्था |

झेक प्रजासत्ताकची स्टार टेनिसपटू बार्बोरा क्रेजिकोव्हाने विम्बल्डन 2024 च्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. लंडनमध्ये शनिवारी (दि.13) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात 31व्या मानांकित क्रेजसिकोव्हाने इटलीच्या 7व्या मानांकित जास्मिन पाओलिनीचा 6-2, 2-6, 6-4 असा पराभव केला. हा अंतिम सामना 1 तास 56 मिनिटे चालला. अंतिम लढतीत क्रेजिकोव्हाने पहिला सेट सहज जिंकला. मात्र, जस्मिनने दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन करत सामना निर्णायक सेटपर्यंत नेला. तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये चुरशीची स्पर्धा झाली, ज्यात क्रेज्सिकोव्हाने बाजी मारली.

28 वर्षीय क्रेजिकोव्हाच हा दुसरा ग्रँड स्लॅम एकेरी अंतिम सामना होता. याआधी तिने 2021 मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते. तर, जस्मिनचा देखील हा दुसरा ग्रँड स्लॅम अंतिम सामना होता. मात्र, यावेळीही तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. क्रेजिकोव्हाने उपांत्य फेरीच्या सामन्यात 2022 ची विम्बल्डन चॅम्पियन एलेना रायबाकिना हिचा 3-6, 6-3, 6-4 असा पराभव केला होता. तर, पाओलिनीने डोना वेकिचचा 2-6, 6-4, 7-6 (10-8) असा पराभव केला. या दोन्ही खेळाडूंनी उपांत्य फेरीत आक्रमक खेळ दाखवला होता.

या वर्षी जास्मिन पाओलिनी सलग दुसरी ग्रँडस्लॅम एकेरीची फायनल खेळत होती. 2016 नंतर महिला खेळाडूनं एकाच वर्षात फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपनची अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. फ्रेंच ओपन 2024 च्या अंतिम फेरीत पाओलिनीला इगा स्विटेककडून पराभव पत्करावा लागला होता.

Exit mobile version