। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
बॅरिस्टर नाथ पै असते तर बेळगाव प्रश्न एवढ्यात निकाली निघाला असता व बेळगाव महाराष्ट्रामध्ये कधीच समाविष्ट झाला असता, असे प्रतिपादन बॅरिस्टर नाथ पै यांच्या खांद्याला खांदा लावून बेळगाव सीमा प्रश्नाच्या लढ्यात सहभागी झालेले त्यांचे बेळगावस्थित परममित्र, स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल याळगी यांनी केले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे आयोजित बॅरिस्टर नाथ पै यांच्या 51व्या पुण्यतिथीनिमित्त व 19 व्या संस्था वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जयप्रकाश चमणकर, उमेश गाळवणकर, डॉ. सुरज शुक्ला, प्रा. परेश गावडे, प्रा. अरुण मर्गज, प्रा. कल्पना भंडारी, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या शुभांगी लोकरे, जयराम डिगसकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी याळगी म्हणाले की, राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकार्य करणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे नाथ पै. निरिच्छ भावनेने, प्रामाणिकपणाने व सामाजिक हिताच्या तळमळीने काम करणारे, मराठी माणसाच्या अस्मितेचा सन्मान करीत नीतिमत्ता सदाचार व भारतीय सांस्कृतिक परंपरांचा आदर करणारा सुसंस्कृत राजकारणी म्हणजे बॅरिस्टर नाथ पै होय.
बेळगाव सीमा चळवळींमध्ये बॅरिस्टर नाथ पै यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना डायनाम्याशिवाय डबल सीट सायकलचा प्रवास, पोलिसांना नाव माहीत नसताना स्वतः पोलिस स्टेशनमध्ये जाऊन अपराधाची दिलेली कबुली, जुलमी इंग्रज अधिकार्यांना दहशत बसावी म्हणून पोलिस स्टेशन जाळत असताना मनुष्यहानी होणार नाही याची खबरदारी घेणारे नाथ पैहोय. प्रकृती बरी नसताना डॉक्टरांनी विश्रांती घ्यावी, असे म्हटलेले असतानाही बेळगावी जनतेच्या सन्मानासाठी भाषण देणे, हे त्यांच्या निधनास कसे कारणीभूत ठरले, अशा विविध प्रसंगांची उपस्थितांना त्यांनी आठवण करून दिली.
यावेळी शिक्षण संस्थेतर्फे नाथ पै पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील अनुक्रमे विजेते युक्ता नार्वेकर, पार्वती कोदे, अमित कुंटे, उत्तेजनार्थ विठ्ठल सावंत, शमिका चिपकर आदींचा गौरव करण्यात आला. ऋचा कशाळीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अरुण मर्गज यांनी प्रास्ताविक केले. परेश धावडे यांनी आभार मानले.