अमित ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
। रसायनी । वार्ताहर ।
मनसेचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश पडवळ यांच्या पुढाकारातून बारवई येथे बसथांबा बांधण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे येथील प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
दरम्यान, बारवई ग्रामस्थांना पनवेलकडे जाण्यासाठी बारवई थांबा रस्त्यावर पावसाळ्यात भिजत उभे राहून वाहनांची वाट पाहावी लागत होती. ही समस्या अविनाश पडवळ यांनी लक्षात घेऊन स्वखर्चाने बारवई बसथांबा उभारला. याच बसथांब्याचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसेचे उपाध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, उपजिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, तालुका अध्यक्ष रामदास पाटील, बारवई ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अविनाश पडवळ यांनी बारवई बसथांबा उभारल्याने त्यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.