नाशिकमध्ये आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई

| नाशिक | प्रतिनिधी |

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विषय महायुतीतील तीनही पक्षांच्या आजी-माजी पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. नाशिकवर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी त्यांच्यात सुप्त संघर्ष चालू आहे. जागेचा तिढा सुटण्याची घटिका समीप येत असताना शाब्दिक द्वंद्व वाढले आहे. नाशिकची जागा शिवसेनेला (शिंदे गट) मिळायला हवी, हा नाशिककरांचा आग्रह असल्याचा दावा पालकमंत्री दादा भुसे यांनी करताच तो माजी पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी लगेचच खोडून काढला. अधिकृतरित्या निर्णय जाहीर होईपर्यंत महायुतीमधील प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी पालकमंत्री तथा विद्यमान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे सांगत आपल्या पक्षाचा दावा सोडलेला नाही.

महायुतीत अटीतटीच्या संघर्षाने नाशिकच्या जागेचा पेच सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या विरोधामुळे ही जागा हिसकावून घेण्याचे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मनसुबे यशस्वी होतील की नाही ते गुलदस्त्यात आहे. ही जागा आपल्या पक्षाकडे राखण्यासाठी तीनही पक्षांचे प्रमुख नेते अर्थात आजी-माजी पालकमंत्र्यांचा आटापिटा सुरू असून जिल्ह्यावर आपला प्रभाव राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नाशिकची जागा शिवसेनेची आहे, लवकरच याबाबत निर्णय जाहीर होईल. ही जागा आम्हाला मिळाल्यानंतर कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सूचित केले. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. जोपर्यंत अधिकृत निर्णय जाहीर होत नाही, तोपर्यंत महायुतीत प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे. या संदर्भात घोषणा होईल, तेव्हा सर्व पक्ष एकत्रितपणे काम करतील, असे त्यांनी नमूद केले. भाजपही या जागेसाठी सुरुवातीपासून आग्रही आहे. माजी पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचे शहरात तीन आमदार आणि 70 नगरसेवक असल्याने नाशिक हा पक्षाचा बालेकिल्ला असल्याचा दाखला वारंवार दिला आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना ही जागा भाजपला मिळावी, असे वाटते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

Exit mobile version