युत्या-आघाड्यामुळे मतदार संभ्रमात
रायगडात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. 23 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून, 25 ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. दरम्यान, अनेक ग्रामपंचायतींमध्ये बहुरंगी लढती होणार असून, निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या आघाड्या आणि युत्या निर्माण झाल्या आहेत. आधीच राज्याचे बदललेले राजकारण आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झालेले राजकारण यामुळे मतदार संभ्रमात पडला आहे. ही ग्रामपंचायत निवडणूक पुढे येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा एक अंदाज ठरवणारी ठरणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाची सत्ता कशी येईल, यासाठी रणनीती आखली जात आहे.
मुरुडः 15 ग्रामपंचायतींसाठी 414 उमेदवारी अर्ज
मुरुड तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत 160 उमेदवारीकरिता तीन दिवसांत 414 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी सरपंचपदाकरिता 55 उमेदवारी, तर सदस्यपदाकरिता 359 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे आहेत. काशिद ग्रामपंचायतीत नऊ सदस्यपदाकरिता 12, तर एक सरपंचपदाकरिता तीन उमेदवारी अर्ज असे एकूण 15 अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राकेश पाटील यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. आगरदांडा ग्रामपंचायतीत सदस्यासाठी 19 तर, सरपंचासाठी दोन असे एकूण 21 अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आरेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. शिघ्रे ग्रामपंचायत 9 सदस्यांसाठी 26, तर सरपंचासाठी 3 असे 29 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष वाणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. भोईघर ग्रा.पं. 9 सदस्यांसाठी 19 तर सरपंचासाठी 5 अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी चिदांनद व्हटकर यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. वळके ग्रामपंचायत सरपंचपदाकरिता 4, तर सदस्यपदाकरिता 29 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजय शेंडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. साळाव ग्रामपंचायत सरपंचपदाकरिता 4, तर सदस्यपदाकरिता 30 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मनोज पुलेकर यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. विहुर ग्रामपंचायत सरपंचपदाकरिता एक, तर सदस्यपदाकरिता 16 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष वाणी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे.एकदरा ग्रामपंचायत सरपंचपदाकरिता 2, तर सदस्यपदाकरिता 6 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आरेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
तळेखार ग्रामपंचायत सरपंचपदाकरिता 5, तर सदस्यपदाकरिता 22 उमेदवारी अर्ज, राजपुरी ग्रामपंचायत सरपंचपदाकरिता 3, तर सदस्यपदाकरिता 21 उमेदवारी अर्ज, बोर्ली ग्रामपंचायत सरपंचपदाकरिता 5, तर सदस्यपदाकरिता 49 उमेदवारी अर्ज, चोरढे ग्रामपंचायत सरपंचपदाकरिता 4, तर 19 सदस्यपदाकरिता उमेदवारी अर्ज, मिठेखार ग्रामपंचायत सरपंचपदाकरिता 1, तर सदस्यपदाकरिता 30 उमेदवारी अर्ज, मांडला ग्रामपंचायत सरपंचपदाकरिता 4, तर सदस्यपदाकरिता 21 उमेदवारी अर्ज, नांदगाव ग्रामपंचायत सरपंचपदाकरिता 9, तर सदस्यपदाकरिता 40 उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राकेश पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया संपली असून, 23 ऑक्टोबरला छाननी तर 25 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असणार, अशी माहिती मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी दिली.
सरपंचपदासाठी भाग्यश्री पाटील यांचा अर्ज
एकदरा ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण स्त्री सरपंच उमेदवारसाठी भाग्यश्री मेघराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे. मंगल वामन झुजे यांनीसुद्धा अर्ज दाखल केला आहे.
थेट सरपंच व सदस्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पांडुरंग आगरकर, पांडुरंग ठोकजी, नंदा मोतीराम पाटील, रोहन निशानदार, हरिश्चंद्र आगरकर, अरुण मढवी, मंगेश पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेजल घुमकरांचा सरपंचपदासाठी अर्ज
मुरुड तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी सायंकाळी संपली असून, नांदगावच्या सरपंचपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या सेजल सुदेश घुमकर या एकमेव महिला उमेदवार असल्याने त्यांच्या उमेदवारीला मतदारांचा वाढता मिळत आहे. त्यांनी आपल्या सर्व मित्र पक्षसह व समर्थक यांना सोबत घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
नांदगाव ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. यातील इंडिया आघाडीत काँग्रेस आय, शिवसेना उध्दव ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आदींचा समावेश असून, भारतीय जनता पार्टीनेही आपले प्रथमच स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. तर शिंदे गटानेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
सेजल सुदेश घुमकर यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी विक्रांत कुबल, महेश मापगावकर, सुदेश घुमकर, नितेश रावजी, कुसुमाकर घुमकर, शामल रावजी, विजयश्री रावजी, मेघा मापगावकर, अमिषा पाटील, अमित भोबू आदी इंडिया आघाडीच्या उमेदवारांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
तळाः सरपंचासाठी 30, तर सदस्यासाठी 86 अर्ज
तळा तालुक्यात मांदाड, निगुडशेत, गिरणे, भानंग, चरई खुर्द, तळेगाव या सहा ग्रामपंचायतींमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण 52 सदस्यपदांसाठी 86 अर्ज दाखल झाले आहेत. तर, सहा सरपंचपदासाठी 30 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशा प्रकारे सरपंच व सदस्यपदांसाठी एकूण 116 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, काही ठिकाणी उमेदवार बिनविरोध आले आहेत. तर काही ठिकाणी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी किती अर्ज मागे घेतले जाणार आहेत, त्यानुसार किती ठिकाणी निवडणूक होईल हे समजेल. ज्या ठिकाणी निवडणूक होईल त्याठिकाणी चुरशीच्या लढती होतील.
कर्जतः सरपंच 40, तर सदस्यपदासाठी 229
कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायततीच्या सार्वत्रिक आणि दोन ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होत आहे. सात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थेट सरपंच पदासाठी 40 तर 67 सदस्य पदासाठी तब्बल 229 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.
तालुक्यातील नसरापूर, वदप, गौरकामत, ओलमन, अंभेरपाडा, खांडस आणि नांदगाव या सात ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची आज 20 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवशी नसरापूर ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच- 4, सदस्यासाठी 36, वदप- थेट सरपंच 7, सदस्यपदासाठी 36, गौरकामत थेट सरपंच 6, सदस्यपदासाठी 34, ओलमन थेट सरपंच 4, सदस्यपदासाठी 35, अंभेरपाडा थेट सरपंच 6, सदस्यपदासाठी 15, खांडस थेट सरपंच 6, सदस्य पदासाठी 39, नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच 7, तर सदस्यपदासाठी 34 अर्ज दाखल झाले आहेत.
म्हसळ्यात निवडणुकीची रणधुमाळी
म्हसळा तालुक्यात नेवरुळ, घूम, जांभुळ, सालविंडे, वरवठणे, वारळ, भेकऱ्याचाकोंड, कुडगाव, पांगलोळी, कोलवट, ठाकरोली, आडी महाड खाडी या 12 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यापैकी नेवरुळ, घूम, ठाकरोली, जांभुळ, आडी महाड खाडी, कुडगाव या सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अलीशेट कौचाली यांच्या पांगलोली गावात सरपंचपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने येथे सरपंच आणि एक सदस्याची निवड बिनविरोध, तर 8 जागांसाठी 19 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
मागील चार दिवसांत सरपंच पदाचे थेट निवडणुकीसाठी 12 ग्राम पंचायतीमध्ये 7 सरपंच बिनविरोध निवडून येणार असल्याचे निदर्शनास येते. बिनविरोध निवड झालेल्या ग्राम पंचायतीमध्ये काही ठिकाणी राखीव जागांसाठी आवश्यक दाखले ऊपलब्ध होत नसल्याने नेवरूल येथे प्रभाग क्रमांक 1 मध्ये नामाप्र स्त्री जागा रिक्त आहे. जांभुळ प्रभाग क्रमांक 2 मध्ये नामाप्र स्त्री जागा रिक्त आहे. कुडगाव येथे प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये नामाप्र अशा दोन राखीव जागा रिक्त आहेत. कोलवट ग्राम पंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये नामाप्र एक जागा रिक्त आहेत. निवडणूक लागलेल्या भेकऱ्याचाकोंड येथे सरपंच पदासाठी दोन आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 जागेकरिता 4 अर्ज दाखल झाले आहेत.
पांगलोली ग्राम पंचायतीमध्ये 9 जागांसाठी प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 जागेवर 6 अर्ज,प्रभाग क्रमांक 2 मध्ये 3 जागेसाठी 6 अर्ज आणि प्रभाग 3 मध्ये 3 जागेसाठी 7 अर्ज दाखल झाले आहेत.वारळ ग्राम पंचायतीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे येथे सरपंच पदासाठी 4 अर्ज दाखल झाले आहेत. सरपंच पद सर्वसाधारण स्त्री करिता राखीव आहे.सदस्य पदाचे 7 जागासाठी प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 जागाकरिता 10 अर्ज, प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2 जागा करीता 5 अर्ज,प्रभाग क्रमांक 3 मध्ये 2 जागांसाठी 5 अर्ज दाखल झाले आहेत. सलविंडे ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग आसुन येथे सरपंच पदासाठी 2 अर्ज दाखल झाले आहेत सदस्य पदाचे 7 जागेसाठी प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 जागा करीता 5 अर्ज,प्रभाग क्रमांक 2 मध्ये आणि 3 मध्ये दोन जागेसाठी प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले आहेत.वरवठ्णे ग्राम पंचायतीमध्ये सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण आसुन येथे 5 अर्ज दाखल झाले आहेत तर तीन वार्डातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 जागेवर 3 अर्ज,प्रभाग क्रमांक 2 मध्ये 3 जागेसाठी 6 अर्ज,प्रभाग क्रमांक 3 मध्ये 7 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.कोलवट ग्राम पंचायतीमध्ये सरपंच पदासाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. सरपंच पद अनु.जाती जमाती करीता राखीव आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 जागा करीता 5 अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन अर्ज आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये दोन जागेसाठी 1 अर्ज दाखल झाला असल्याचे निवासी नायब तहसिलदार तेलंगे यांनी माहिती देताना सांगितले.
उरणः सरपंच 14, तर सदस्यांसाठी 134 अर्ज
उरण तालुक्यातील चिरनेर, दिघोडे व जासई या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम जोमाने वाजू लागले असून, उमेवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 14, तर 41 सदस्यांसाठी 134 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
चिरनेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 4, तर 15 सदस्यांसाठी एकूण 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दिघोडे सरपंचपदासाठीही 4 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जासई सरपंच 6, तर 17 सदस्यांसाठी एकूण 73 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती उरणचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.
खालापुरात 22 सरपंचासाठी 94, तर सदस्यासाठी 583 अर्ज
तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरच्या दिवसापर्यंत 22 सरपंचपदासाठी 94, तर 203 सदस्यपदासाठी 583 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत पूर्ण होणाऱ्या बावीस ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. खालापूर तालुक्यातील तांबाटी, जांभिवली (छत्तीशी) नंदनपाडा, ठाणे न्हावे, होनाड, वावर्ले, वरोसे, बोरगाव (खु) जांबरुग, माणकवली, वासांबे, चांभार्ली, माजगाव, इसांबे, सावरोली, कुंभिवली, आत्करगाव, खानाव, चिलठण, नारंगी, शिरवली (छत्तीशी ) बीडखुर्द ग्रामपंचायतीसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
गुरुवार आणि शुक्रवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन दिसून आले. गावपातळीवर युती, आघाडी यांचा सावळागोंधळ झाल्याचे दिसून येत आहे. आमदार महेंद्र थोरवे यांना सावरोली, कुंभिवली, तांबाटी या ग्रामपंचायती महत्त्वाच्या असून, तिथे सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खालापूरला जत्रेच स्वरूप आले होते. वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी गर्दी आवरण्यासाठी पोलिसांकडून तहसील कार्यालयाच्या आवारात उमेदवार सोडून कोणाला सोडले जात नव्हते.
सुधागडात 13 ग्रामपंचायतींसाठी 346 अर्ज
सुधागड तालुक्यात 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शुक्रवारी (दि.20) अखेरच्या दिवसापर्यंत तालुक्यात सदस्य व सरपंच पदासाठी एकूण 346 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गोमाशी, महागाव व दहीगाव या ग्रामपंचायतीमधून सरपंचपदासाठी एकच अर्ज दाखल झाला असून, या तिन्ही ग्रामपंचायतींचे सरपंचपद बिनविरोध झाले आहे.
भार्जे सरपंचपदासाठी 4, सदस्यपदासाठी 27, दहिगाव सरपंच 1 व सदस्यपदासाठी 9, गोमाशी सरपंच 1 व सदस्य 15, कळंब सरपंच 4 व सदस्यासाठी 12, नाडसुर सरपंच 4 व सदस्यासाठी 30, महागाव सरपंच 1 व सदस्यासाठी 19, नांदगाव सरपंच 5 व सदस्यासाठी 13, नवघर सरपंच 4 व सदस्यासाठी 28, पाच्छापुर सरपंच 2 व सदस्यासाठी 15, परळी सरपंच 4 व सदस्यासाठी 27, राबगाव सरपंच 5 व सदस्यपदासाठी 22, रासळ सरपंच 4 व सदस्यपदासाठी 32, वऱ्हाड जांभुळपाडा सरपंच 9 व सदस्यपदासाठी 49 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
शिरवलीत महेश पाटील यांना मतदारांचा प्रतिसाद
खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, छत्तीशी विभागातील शिरवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी इच्छुक असलेले महेश काशिनाथ पाटील यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत गावातील तरूण युवक, महिला, ज्येष्ठ व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला.
नागोठणेः सरपंचपदासाठी 9, तर सदस्यांसाठी 64 अर्ज दाखल
नागोठणे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेतून निवडून येणार असलेल्या थेट सरपंचपदासहीत सहाही प्रभागांतील सदस्यपदासाठी उमेदवारी अर्जांचा वर्षाव झाला आहे. शुक्रवार, दि. 20 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नागोठणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी 9, तर सहा प्रभागांतील 17 जागांसाठी एकूण 64 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या सरपंचपदासाठी 9 महिला उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर सदस्यपदासाठी नागोठण्यातील प्रभाग क्र. 1 मधील 3 जागांसाठी 9, प्रभाग क्र. 2 मधील 3 जागांसाठी 12, प्रभाग क्र. 3 मधील 2 जागांसाठी 6, प्रभाग क्र. 4 मधील 3 जागांसाठी 12, प्रभाग क्र. 5 मधील 3 जागांसाठी 13 तर प्रभाग क्र. 6 मधील 3 जागांसाठी 12 उमेदवार असे एकूण 64 उमेदवारी अर्ज शुक्रवारी अंतिम दिवशी दाखल करण्यात आल्याचे नागोठणे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचे निवडणूक अधिकारी अशोक दांडेकर यांनी सांगितले.