। हरिहरेश्वर । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्याला निसर्गाचे मुक्त हस्ताने वरदान लाभले आहे. गेल्या काही वर्षांपासून बंद असणार्या बॉक्साईट उत्खनन करणार्या कंपनीला लोकप्रतिनिधींचा आणि प्रशासनाचा आशिर्वाद मिळाल्यामुळे पुन्हा तालुक्यातील या खाणीमध्ये यंत्राच्या सहाय्याने खोदकाम जोरात सुरु आहे. त्यामुळे येथील पर्यावरणाचा र्हास होऊन निसर्ग संपन्न कोकण नष्ट होण्याच्या मार्गावर असून पर्यटन क्षेत्रही धोक्यात आल्यामुळे पर्यावरण प्रेमी आणि नागरीकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव व संदिप जाधव हे पर्यावरण संवर्धन आणि रक्षणाकरीता सर्वोच्च न्यायालयात आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे जनहीत याचिका दाखल करणार आहेत.
श्रीवर्धन तालुक्यातील दांडा, बागमांडले, सायगांव, केळीचीवाडी, गडबवाडी, कुरवडे, चिखलप, मेघरे, हरवित, कुडगाव या परिसरातील जागेवर एका कंपनीने गेली अनेक वर्षे बेकायदेशीरपणे बॉक्साईट मालाचे अवैध उत्खनन केले असून आताही मोठया प्रमाणात उत्खनन सुरु आहे. भरडखोल व शेखाडी तसेच इतर ठिकाणी नवीन खाणी सुरु होणार आहेत. त्याच कंपनीने आपल्या नियंत्रणाखाली इतर बोगस कंपन्यां निर्माण करुन शासनाची दिशाभूल केली आहे. गेली कित्येक वर्षे येथील खाणींमधून उत्खनन केलेले बॉक्साईट दिघी बंदरातून परदेशात पाठवून कंपनीने या बॉक्साईट तालाची विक्री करुन त्यातून करोडे रुपयांचा नफा कंपनीने कमावला आहे. उत्खननाला विरोध होऊ नये म्हणून कंपनीकडुन लाखो रुपयांची रसद पुरवून संघर्ष दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे या अनागोंदी कारभाराची चौकशी सरकारने करावी अशी मागणी होत आहे.
गुरुचरण, वने, 35 सेक्शन असे शिक्के असणार्या जमिनीवर सर्व नियम धाब्यावर बसवून बॉक्साईटचे उत्खनन केले असताना प्रशासनाने या अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष करुन कंपनीवर गुन्हा दाखल केलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे येथील शेतकर्यांनी त्यांच्या जमिनीचे करार केलेले नसताना खाण परिसरातील शेतकर्यांच्या जमिनीवरही उत्खनन करण्यात आलेले आहे.कंपनीने येथील शेतकर्यांचे खोटे करार करुन घेतले आहेत. त्यामुळे झालेल्या फसवणुकीविरोधात हे शेतकरी कंपनी विरोधात न्यायालयात दाद मागणार आहेत. खाणीतील बॉक्साईट मालाचे उत्खनन करण्याकरीता सुरुंग स्फोटकाचा वापर करण्यात येत असल्याने खाण परिसरातील घरांना तडे बसत आहेत तसेच पाण्याच्या झर्यांचे नैसर्गिक स्त्रोत ही गायब होऊन तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने या नागरीकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. वातावरणात धुळीचे कण मिसळून प्रदुषणात वाढ होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. तालुक्यात सुरु झालेल्या या बॉक्साईड खाणींमुळे बागायती पिकांसह इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने बागायतदारांना दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.






