बावनकुळेंच्या वक्तव्याने राष्ट्रवादीतही नाराजी

‌‘आमची सीट आम्हालाच पाहिजे ‘; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा दावा
| अलिबाग | प्रतिनिधी |
आगामी लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये भाजपचा उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिबागमध्ये महाविजय 2024 या संवाद यात्रा कार्यक्रमात दिल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.“मित्रपक्षाने असे वक्तव्य यावेळी करणे चुकीचे आहे. आमची सीट आम्हालाच पाहिजे”, असा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी कृषीवलशी बोलताना केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत बावनकुळे यांनी खासदार हा भाजपचाच असेल, अशी घोषणा केली. त्यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. त्या पक्षाचे सुनील तटकरे रायगडचे खासदार आहेत. त्यांची उमेदवारी मित्रपक्षानेच अडचणीत आणल्याचे चित्र स्पष्ट निर्माण झाले आहे.

दरम्यान, बावनकुळे यांनी विधानसभा उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता, त्यांनी भाजप पक्षातील एका पुढाऱ्याचे नाव सुचविले. त्यामुळे शिंदे गटातदेखील नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे बावनकुळे आले आणि दोन्ही मित्रांना नाराज करून गेले, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

Exit mobile version