तळोजा येथे देशातील पहिल्या BBATRC अकॅडमीचे लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस यांची दहा कोटींची घोषणा
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या पुढाकारातून तळोजा (नवी मुंबई) येथे उभारण्यात आलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (BBATRC) या देशातील पहिल्यावहिल्या वकिलांसाठीच्या प्रशिक्षण व संशोधन अकॅडमीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज (कोर्ट क्राफ्ट) यातील दरी भरून काढणारा हा उपक्रम ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर होते. मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ॲड. अनिल सी. सिंग, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे आणि गोव्याचे महाधिवक्ता ॲड. देविदास पांगम, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष ॲड. जयंत डी. जायभावे, बीबीएटीआरसीचे अध्यक्ष ॲड. डॉ. उदय पी. वारुंजीकर, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. आशिष पी. देशमुख आणि समन्वयक व उपाध्यक्ष ॲड. संग्राम डी. देसाई उपस्थित होते. तसेच बार कौन्सिलचे सदस्य ॲड. मोतीसिंह जी. मोहता, ॲड. गजानन बी. चव्हाण, ॲड. मिलिंद एस. पाटील, ॲड. वंसत डी. साळुंखे, ॲड. मिलिंद एस. थोबडे, ॲड. अविनाश जे. भिडे, ॲड. वसंतराव ई. भोसले, ॲड. अनिल एम. गोवर्दिपे, ॲड. विवेकानंद एन. घाटगे, ॲड. आसिफ एस. कुरेशी, ॲड. अविनाश बी. आव्हाड, ॲड. अमोल एस. सावंत, ॲड. अण्णाराव जी. पाटील, ॲड. सतीश ए. देशमुख, सीनिअर ॲड. सुदीप आर. पासबोला, ॲड. सुभाष जे. घाटगे, ॲड. विठ्ठल बी. कोंडे-देशमुख, ॲड. अहमदखान यू. पठाण, ॲड. राजेंद्र बी. उमाप आणि ॲड. पारिजात एम. पांडे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, बदलते कायदे, नवे फौजदारी कायदे आणि सारख्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणारे प्रशिक्षित वकील व अभियोजक घडविण्यासाठी ही अकॅडमी उपयुक्त ठरेल. राज्य शासनाकडून दहा कोटी रुपयांचे अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. संशोधनाशिवाय गुणवत्ता येत नाही; त्यामुळे हे केंद्र भविष्यात दर्जेदार कायदेविषयक संशोधनाचे केंद्र बनेल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात ‘विधी महर्षी पुरस्कार’ न्यायमूर्ती बी. बी. चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. अमरावतीचे दिवाणी वकील ज्ञानेश्वर बावरेकर यांना मरणोत्तर सन्मान देण्यात आला.
अकॅडमीची वैशिष्ट्ये
वकिलांसाठी देशातील पहिले समर्पित ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर
कायद्याचे शिक्षण + प्रत्यक्ष कोर्ट क्राफ्ट यांचा संगम
नवीन फौजदारी कायदे, डिजिटल कायदे आणि वापरावर प्रशिक्षण
कायदेविषयक दर्जेदार संशोधनाला चालना
राज्य शासनाकडून 10 कोटी अनुदान जाहीर
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचा पुढाकार
न्यायमूर्तींसाठी प्रशिक्षण अकॅडमी आहे, तर वकिलांसाठी का नाही? या प्रश्नाचे उत्तर आज मिळाले. कोर्ट क्राफ्ट शिकवणारी ही अकॅडमी काळाची गरज आहे.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
वकिलांचे दर्जेदार प्रशिक्षण न्यायप्रक्रियेची गुणवत्ता उंचावेल.
– भूषण आर. गवई, माजी सरन्यायाधीश
बार कौन्सिलचा हा उपक्रम वकिलांसाठी नवे दालन उघडणारा ठरेल.
– ॲड. हर्षद निंबाळकर, अध्यक्ष







