आधी तंदुरुस्ती, मग मैदान
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आशिया चषक स्पर्धेसाठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह इतर अव्वल खेळाडूंची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये रक्त तपासणीसह संपूर्ण शरीराची चाचणी केली जाईल. कारण, आगामी विश्वचषक 2023च्या दृष्टीकोनातून बीसीसीआयला खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही. आशिया चषकाला 30 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परतलेल्या आणि आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळत नसलेल्या खेळाडूंना 13 दिवसांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, अष्टपैलू हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच त्यांच्या सराव शिबीराला सुरुवात होणार असून त्यात तंदुरुस्ती चाचणी केली जाणार आहे. लिपिड प्रोफाइल, रक्तातील साखर (उपवास आणि पीपी), यूरिक ऍसिड, कॅल्शियम, जीवनसत्त्वे बी 12 आणि डी, क्रिएटिनिन, टेस्टोस्टेरॉन या घटकांची तपासणी केली जाईल. त्याचबरोबर डेक्सा चाचण्या देखील घेतल्या जातील, हाडांची घनता तपासण्यासाठी हा एक प्रकारचा स्कॅन आहे. दरम्यान व्हीव्हीएस लक्ष्मण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघाचे फिजिओ हे देखील उपस्थित राहणार आहेत.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने खेळाडूंच्या फिटनेस कार्यक्रमाविषयी सांगितले की, खेळाडूंसाठी हा एक खास कार्यक्रम आहे कारण, पुढील दोन महिने त्यांनी तंदुरुस्त राहावे अशी आमची इच्छा आहे. कोणी प्रोग्राम फॉलो केला आणि कोणी केला नाही हे ट्रेनरला समजेल. यानंतर, ज्या खेळाडूने याचे काटेकोरपणे पालन केले नाही त्याचे काय करायचे हे संघ व्यवस्थापन ठरवेल, असे तो म्हणाला. अलीकडेच वेस्ट इंडिज आणि आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत भारतीय संघातील अव्वल खेळाडू खेळले नाहीत. या टी-20 मालिकेसाठी त्यांना विश्रांती देण्यात आली होती. आता विराट कोहलीसह रोहित शर्मासारखे खेळाडू थेट आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहेत. लवकरच भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेसाठी श्रीलंकेला रवाना होणार आहे.
भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.