प्रत्येक खेळाडूला करावा लागणार सराव
। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतीय संघाता तब्बल 12 वर्षांनंतर घरच्या भूमीवर कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाचा 113 धावांनी पराभव झाला. यासह तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सलग दोन सामने न्यूझीलंडने जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. भारताच्या या मालिका पराभवानंतर काही तासांनंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने एक फर्मान काढलं आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी मुंबईत कोणतेही पर्यायी सराव सत्र नसल्याची माहिती सर्व खेळाडूंना देण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार्या तिसर्या कसोटीपूर्वी सर्वच खेळाडूंना दोन सराव सत्रांमध्ये भाग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका सूत्राने सांगितले की, “संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना 30 आणि 31 ऑक्टोबरला दोन दिवस सरावासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. हे अनिवार्य आहे आणि कोणीही हे सराव सत्र वगळू शकत नाही.
भारतीय संघ आपल्या खेळाडूंना सामन्याच्या एक दिवस आधी नेटवर न येण्याची परवानगी देत आले आहे, जेणेकरून ते पाच दिवसीय सामन्यापूर्वी मानसिकरित्या तयार होऊ शकतील. मात्र, या मालिकेतील पराभवाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. सहसा, वेगवान गोलंदाज आणि अव्वल खेळाडू सराव सत्रात सहभागी होत नाहीत किंवा कसोटी सामन्यापूर्वी साधारण ट्रेनिंग करता. गेल्या काही काळापासून ही एक सामान्य प्रथा आहे, विशेषत: क्रिकेटपटूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा मुद्दा लक्षात घेता संघ व्यवस्थापन सराव सत्राला सूट देते. खेळाडूंना पुन्हा रिकव्हर होण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळू शकेल, यासाठीही सूट दिली जाते. पण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक असणार आहे, त्यामुळे संपूर्ण संघ सराव सत्रात सहभागी होईल, जिथे खेळाडू कठोर सराव करतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सध्या सुरू असलेली मालिका 0-3 ने गमावणं भारताला परवडणारं नाही. दरम्यान, भारतीय कसोटी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल त्यांच्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवण्यासाठी मुंबईत पोहोचले आहेत, तर बहुतांश भारतीय खेळाडू 27 तारखेला सपोर्ट स्टाफसह मुंबईला पोहोचतील.