बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार?

मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक

| मुंबई । वृत्तसंस्था ।

भारतीय क्रिकेट संघाला 1 जुलैपासून नवीन प्रशिक्षक मिळणार आहे. त्याची शोधाशोध बीसीसीआयने सुरु केली असून 27 मे पर्यंत अर्जही मागविले आहेत. यासाठी काही अटीदेखील ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजेच राहुल द्रविडला पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही आहे. अशातच नव्या कोचसाठी नावांच्या चर्चा सुरु झाल्या असून बीसीसीआय परदेशी प्रशिक्षक नेमते की भारतीय, असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे.

भारती संघ आणि परदेशी कोच आणि वाद ही समीकरणे काही नवीन नाहीत. अशातच बीसीसीआयने परदेशी प्रशिक्षकासाठी माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर टॉम मूडी आणि न्यूझीलंडचा माजी कप्तान स्टीफन फ्लेमिंगसह अन्य खेळाडूंशी चर्चा केली आहे. अशातच भारतातून गौतम गंभीर आणि विरेंद्र सहवाग हे आक्रमक खेळाडूदेखील इच्छुक असल्याचे समजते आहे. नाव न छापण्याच्या अटीवर बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने ही माहिती दिली आहे. भारतीय खेळाडूंमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणचे देखील नाव चर्चेत आहे. तसेच माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू जस्टिन लैंगरचे देखील नाव आहे. बीसीसीआय यावेळी परदेशी प्रशिक्षकावर डाव खेळण्याची शक्यता या सूत्राने वर्तविली आहे. यामध्ये फ्लेमिंगची दावेदारी प्रबळ समजली जात आहे. मात्र यासाठी फ्लेमिंगला बीसीसीआयकडे अर्ज करावा लागणार आहे. नव्या कोचला 2027 च्या वर्ल्डकपपर्यंतची मुदत देण्यात येणार आहे. साधारण तीन वर्षे हा कोच कार्यरत राहणार आहे. मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीनंतर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Exit mobile version