लेटकमर्स कर्मचार्यांना नोटीस
| पेण | वार्ताहर |
पेण पंचायत समितीमधील कर्मचार्यांच्या गैरवर्तवणुकीबाबतचे सविस्तर वृत्त दै.कृषीवलमध्ये प्रसिद्ध होताच प्रभारी बीडीओंना जाग आली असून,जे कर्मचारी उशिरा आलेत अशा सर्वांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे.
प्रभारी बीडीओ भाउसाहेब पोळ यांनी कृषीवल प्रतिनिधीशी बोलताना बुधवारी ( 19 जुलै ) जे जे कर्मचारी उशिरा येतील त्या त्या कर्मचार्यांना कारणादाखवा नोटीस देण्यात येईल, असे सुचित केले होते. त्यानुसार एकूण 11 कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत. यामध्ये वैभव कुमार मिस्तरी कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विक्रांती तांडेल विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), प्रसाद म्हात्रे विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), शामकांत घरत वरिष्ठ सहायक, रमेश कडलग वरिष्ठ सहायक, सुधीर मढवी कनिष्ठ सहायक, सारिका पाटील कनिष्ठ सहायक, वृषाली मोकल कनिष्ठ सहायक, सुधा पाटील कनिष्ठ सहायक, छाया पाटील कनिष्ठ सहायक, मेघा पाटील कनिष्ठ सहायक यांचा समावेश आहे.
11 कर्मचार्यांना दिलेल्या नोटीसमध्ये सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी 9ः45 ते सायंकाळी 6ः15 व वर्ग 4 चे कर्मचारी यांनी सकाळी 9ः30 ते सायंकाळी 6ः30 पर्यंत कार्यालयात उपस्थित राहणेची वेळ असल्याचे आपले निदर्शनास आणले आहे. व त्याचे काटेकोरपणी पालन करणेची सूचना दिलेली आहे. तरीही आज आपण उशिराने कार्यालयात आला आहात ही बाब योग्य नाही. तरी याबाबत आपण आपला समाधानकारक खुलासा हे पत्र मिळताच दोन दिवसात या कार्यालयात सादर करावा. अन्यथा आपणाविरूध्द जरूर ती शिस्त भंगाची कारवाई केली जाईल. अशा प्रकारचे पत्र 11 कर्मचार्यांना दिले आहे.