। पाली/बेणसे । वार्ताहर ।
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग क्रमांक 548 (अ) च्या रुंदीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. सद्यस्थितीत या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी वाहतुकीला अडथळा येत असून चिखल व खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पाऊस पडला की चिखल, ऊन पडले की धुरळा अशी दुहेरी समस्या सतावत आहे. जवळपास 200 कोटी रूपये खर्चून राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम होत आहे. या रस्त्याचे काम पूर्वी मोनिका कन्स्ट्रक्शनकडे होते. मात्र त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्याने एमएसआरडीसीने हे काम बिसीसी कन्स्ट्रक्शनकडे दिले होते. मात्र तरीही अर्धवट सुरू असलेले काम, रस्त्यावरील खड्डे आणि निकृष्ठ दर्जाचे काम यामुळे आता हे काम वरह इन्फ्रा लिमिटेड कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. या कंपनी अंतर्गत 6 सबकाँट्रॅक्टर काम करत आहेत. मात्र अजूनही कामाला पाहिजे तसा वेग आलेला नाही.
- पाली खोपोली राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडले आहेत. पाऊस असल्याने कामात अडथळा निर्माण होतोय. लवकरच एका बाजूच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणचे काम पूर्ण करून मार्ग सुस्थितीत केला जाईल व तेथून वाहतूक वळवली जाईल. – सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी