सावधान! राज्यावर पुन्हा निर्बंधाचे सावट

केंद्रीय पथकाकडून पाहणी
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसांत रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन दिवसांत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


राज्यात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या हा धोक्याचा अलार्म आहे. दोन दिवसांमध्ये रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यात मुंबईचा पॉझिटिव्हीची रेट हा चार टक्क्यांवर गेला आहे. ही परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ याबाबत निर्णय घेईल.
राजेश टोपे, आरोग्यमंत्री

केंद्राची टीम दौर्‍यावर
राजेश टोपे म्हणाले की, केंद्राची टीम सध्या महाराष्ट्राच्या दोन-तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहे. ही टीम वाढलेले रुग्ण, त्यांचे प्रमाण, ओमिक्रॉनचे रुग्ण, लसीकरण, पहिला डोस आणि दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या या सार्‍यांचे अवलोकन करणार आहे. लसीकरणासाठी स्थानिक नेते, प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे. स्थानिक नेत्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

क्वारंटाईन किती दिवस?
अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांचा क्वारंटाईन काळ कमी करण्यात आला आहे. याबाबत प्रश्‍न विचारला असता टोपे म्हणाले की, याबाबतचा निर्णय हा आयसीएमआरच्या निर्देशानुसार घेण्यात येईल. गरज पडल्यास आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देऊ. मात्र, ज्यांना शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करा आणि काळजी घ्या. महाराष्ट्रात आपण दिवसाला 8 लाख लसीकरण करत होतो, आता आपण 5 लाख लसीकरण करत आहोत. हे आपल्याला भूषणावह नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. बूस्टर डोसचे लसीकरण 10 जानेवारीपासून होणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबईत पुन्हा कोरोना वाढतोय

देशभरात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या ठिकाणी गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 1377 नवे कोरोना संक्रमित सापडले आहेत. त्यातच एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद देखील झाली आहे. गेल्या 7 महिन्यांचा हा उच्चांक आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 26 नवीन रुग्ण समोर आले आहेत. यानंतर राज्यातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 167 वर गेली आहे.

Exit mobile version