काळजी घेण्याचे आवाहन
| मुरूड | वार्ताहर |
मुरूड तालुक्यासह रायगड जिल्ह्याचे तापमान गेल्या 4 दिवसांपासून झपाटयाने खाली येत असून14 ते 15 सेल्सियस इतके घसरले आहे. त्यामुळे मोठा गारठा पडला असून रात्री हुडहुडी भरत असल्याचे जाणवत आहे.
दमट हवामान असणारा मुरूड तालुका समुद्र किनारी असूनही परवा येथील तापमान 17 ते 16 सेल्सियस होते. हेच तापमान आता 14 ते 15 पर्यंत कमी-जास्त होत आहे. पहाडी राज्यात होणार्या बर्फवृष्टीच्या गारठ्याचा परिणाम महाराष्ट्र राज्यात देखील सर्वदूर होताना दिसत असून ठिकठिकाणी उष्णता मिळवण्यासाठी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. गरम आणि उबदार कपड्यांना अचानक मागणी वाढली असून गारठा आधिक वाढण्याची चिन्हे स्पष्टपणे जाणवत आहेत. मोटारसायकल वरूनसोमवारी सायंकाळी उशिरा राजपुरी समुद्रकिनारी मार्गाने मुरूड कडे येताना थंडीने कुडकुडायला होत होते.
रायगडात उरण, करंजा, श्रीवर्धन, अलिबाग, मुरूड, दिवेआगर, रेवदंडा, बोर्ली, काशीद, नांदगाव, किहीम, आक्षी, मोरा, आगरदांडा, दिघी, हरिहरेश्वर, नागाव, मांडवा आदी समुद्रकिनारी पट्टयात गुलाबी थंडी असल्याने शैक्षणिक सहली आणि पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे.
सुरक्षित पर्यटन करा
आगामी 3 ते 4 दिवसात आधिक गारठा वाढण्याची शक्यता असल्याने बाहेर फिरायला जाताना उबदार कपडे, आवश्यक औषधे, घेणे हिताचे आहे. यंदा कडक उन्हाळा, भरपूर पाऊस आपण अनुभवला. आता थंडीचा देखील मोठा गारठा सहन करावा करावा लागणार असे सिग्नल मिळत आहेत. समुद्रात रात्री मासेमारीस जाणार्या मच्छिमारांना तर रात्रभर थंडीत कुडकुडत मोठा सामना करावा लागत असल्याची माहिती मुरूड येथे मच्चीमारांनी दिली. येणारा गारठा कसा असेल हे सांगता येणार नाही; परन्तु पुरेशी काळजी घेणे मात्र आवश्यक आहे. आजारी व्यक्तींना अशा गारठ्याचा मोठा त्रास होऊ शकतो. म्हणून इशार्या कडे दुर्लक्ष करू नका. घटलेली हवेतील आद्रता आणि उत्तरेकडून अतिशीत येणारे वारे यामुळे थंडीची तीव्रता वाढती राहील असा अंदाज खाजगी हवामान एक्स्पर्ट अभिजित मोडक, यांनी व्यक्त केला आहे.