सावधान … कॉपी केल्यास शिक्षण थांबणार

| रायगड । प्रतिनिधी ।

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत असून इयत्ता दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होईल. कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल विभाग व जिल्हा परिषदेची पाच भरारी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर एक पथक नियुक्त करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रात कॉपी करताना किंवा कॉपी करून उत्तरे लिहिताना सापडलेल्या विद्यार्थ्यालापुढील पाच परीक्षांना बसता येणार नाही. त्याचबरोबर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही कॉपी न करता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील आठ प्रांताधिकारी, 15 तहसीलदार, नायब तहसीलदार, पंचायत समित्यांचे 15 गटविकास अधिकारी, माध्यमिक, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी यांच्यासह दोन उपशिक्षणाधिकार्‍यांची विशेष पथके देखील जिल्ह्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.

परीक्षा केंद्रावर अंगणवाडी पर्यवेक्षक, महसूल व जिल्हा परिषदेचे कर्मचारी, जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. बैठे पथकात एकूण तीन सदस्य असतील, त्यात एक महिला असणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी केंद्रावर हजर राहायचे असून पेपर सुरू झाल्यावर कोणालाही परीक्षेला बसू दिले जाणार नाही. परीक्षा हॉलमध्ये जाताना प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेतली जाईल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

कॉपी करणार्‍या विद्यार्थ्यांचे निर्णय निकालापूर्वीच होतात. संबंधित विद्यार्थ्याने खरोखर कॉपी केली होती का, कॉपीतील किती मजकूर उत्तरपत्रिकेत जसाच्या तसाच लिहिला, नेमकी कॉपी कोणी केली होती यासंबंधीची माहिती घेताना त्या विद्यार्थ्याच्या मागील व पुढे बसलेल्या विद्यार्थ्याचाही जबाब बोर्डाचे चौकशी अधिकारी नोंदवतात. त्यानंतर कॉपी प्रकरणातील विद्यार्थ्याला एक वर्षापर्यंत की तीन वर्षांपर्यंत परीक्षेची बंदी घालायची, याचा निर्णय बोर्डाकडून होतो.

परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पाणी वाटप करणार्‍या कर्मचार्‍यांची नेमणूक आता शाळांना करता येणार नाही. बोर्डाने त्यासंबंधीचे आदेश सर्वच केंद्रांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे काम त्यांच्याच माध्यमातून होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर या वर्षीपासून परीक्षा हॉलवरील पर्यवेक्षकच स्वत:कडे पाण्याची बाटली ठेवून विद्यार्थ्यांना पाणी देतील, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

Support authors and subscribe to content

This is premium stuff. Subscribe to read the entire article.

Subscribe

Gain access to all our Premium contents.
More than 100+ articles.

Buy Article

Unlock this article and gain permanent access to read it.
Exit mobile version