शेकापच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज रहा

धैर्यशील पाटील यांचे आवाहन
शेकाप वर्धापनानिमित्त आढावा बैठक

पाली/गोमाशी । वार्ताहर ।

सुधागडची जनता नेहमी शेकापच्या आपल्या बाजूने राहिलेली आहे येणार्‍या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत सुधागडमध्ये शेका पक्ष नक्कीच चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या झालेल्या पराभवाचा वचपा आपण घेणारच आहोत म्हणून तुम्ही आतापासूनच कामाला लागा असे असे आवाहन माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी पाली येथे केले तर शेकाप अजून संपलेला नसून,वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाची ताकद रायगडच्या जनतेला दाखवून देऊया,असे प्रतिपादन जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील यानी केले.

2 ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या तयारीसाठी सुधागड तालुक्यात गुजराती हॉल पाली येथ सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी सभेसाठी आमदार बाळाराम पाटील,रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, जि प सदस्य सुरेश खैरे, उपनगराध्यक्ष अरीफ मणियार, उत्तमराव देशमुख, सविता हंबीर, प्रणाली शेळके, नितीजा जोशी, विनायक जाधव,तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना धैर्यशील पाटील म्हणाले की, विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला असेल पण आपला कार्यकर्ता तेव्हाही सोबत होता आणि आताही सोबतच आहे. सुधागडच्या मतदारांनी नेहमी मला साथ दिली. मागील दहा वर्षात झालेल्या निवडणुकीत कमी मताने आपले उमेदवार पडले असतील पण पक्षाने पुन्हा उभारी घेऊन सुरेश खैरे यांना 5000 मताने निवडून आणले ही उदाहरणे आहेत,असे त्यानी सुचित केले.

कोट
येणार्‍या काळात आपण कोणाबरोबर युती आघाड्या करायचे आहे ते अजून ठरले नाही आपण येणार्‍या परिस्थितीनुसार आपल्या उमेदवाराचा विजय होईल त्यानुसार योग्य ते निर्णय घेतले जातील. या वर्धापन दिनाला बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहून आपला पक्ष संपले असे म्हणणार्‍यांना शेकापची ताकद दाखवून देऊ.
अ‍ॅड. आस्वाद पाटील,जिल्हा चिटणीस

आ.बाळाराम पाटील वर्धापन दिनाच्या दिवशी सुधागड तालुका जवळचा असल्यामुळे आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले. पुढे होणार्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा वर्धापन दिन देखील महत्त्वाचा असेल. मागील निवडणुकांमध्ये आपले आमदार पडले असतील तरी पक्ष संपत नाही तर तो जोमाने उभा राहतो हा आतापर्यंत शेकापक्षाचा इतिहास आहे.नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होणार्‍या गुजरातच्या निवडणुकीबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होतील अशा प्रकारचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे आपण देखील याचा गांभीर्याने विचार करून आतापासूनच कामाला लागले पाहिजे असे आवाहनही बाळाराम पाटील यांनी केले.
सुरेश खैरे यांनी प्रास्ताविकमधून सुधागड तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते कोणी कोणत्या पक्षात गेलेले नाहीत आणि जाणार देखील नाहीत असा ठाम निर्धार व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी नांदगाव पंचक्रोशीतील सहा ग्रामपंचायतमधील कार्यकर्त्याची वर्धापनदिन तयारी बाबत सभा घेण्यात आली. पुढील दिवसात उर्वरित ग्रामपंचायतीच्या सभा लावून वर्धापन दिनाबाबत संदर्भात चर्चा करण्यात येईल. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व ठेवले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनासाठी सुधागड तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील त्याचबरोबर महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असेल असे खैरे यांनी सांगितले.

Exit mobile version