बीट मार्शलकडून महिलेला जीवदान

पोलीस शिपाई सागर माळी यांची धाडसी कामगिरी

। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।

कळंबोली परिसरातील रोडपाली येथील गणपती विसर्जन तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव कळंबोली पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने धाडसी कामगिरी करत वाचविला. पोलीस शिपाई सागर माळी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी मारून महिलेला सुखरूप बाहेर काढल्याने त्यांच्या या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.10) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रूममार्फत बीट मार्शल 1 च्या एम.डी.टी.वर संदेश प्राप्त झाला की, रोडपाली गणपती विसर्जन तलावात एका महिलेने उडी मारली असून, पोलीस मदतीची आवश्यकता आहे. सदर माहिती मिळताच कळंबोली पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पथकातील पोलीस शिपाई आकाश वानखेडे आणि पोलीस शिपाई सागर माळी हे अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी संबंधित महिला तलावात बुडत असल्याचे दिसून आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस शिपाई सागर माळी यांनी तत्काळ तलावात उडी घेत महिलेला बाहेर काढले. त्यानंतर महिलेला तातडीने पोलीस वाहनातून आशा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी महिलेला एमजीएम हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे. सदर महिलेचे नाव अनिता बालाजी नांदे (35), रा. कळंबोली असे असून ती काहीशी मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संपूर्ण घटनेची माहिती कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली.

Exit mobile version