| पनवेल | वार्ताहर |
एक तरुण रात्रीच्या साडेबारा वाजता दोन मुलींसोबत भांडत होता. तो तरुण मोठ्या आवाजात का भांडतोय, हे तिथे रिक्षाची वाट पाहात उभ्या असलेल्या एका 69 वर्षीय डॉक्टरांनी पाहिले. एवढेच निमित्त झाल्याने या 20 वर्षीय तरुणाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरांच्या डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले. हा सर्व प्रकार कामोठे वसाहतीमधील सेक्टर 7 येथे घडला.
करंजाडे येथे राहणारे 69 वर्षीय नंदलाल रायदास हे कामोठे वसाहतीमधील सेक्टर 7 येथील साईप्रसाद आर्केड या इमारतीजवळ रिक्षाची वाट पाहात उभे होते. यादरम्यान कामोठे वसाहतीमधील सेक्टर 22 येथील तुलसी हाईट्स या इमारतीमध्ये राहणारा 20 वर्षांचा शंभुराज भोसले हा दोन मुलीसोंबत तिथे भांडण करत होता. डॉ. नंदलाल यांनी शुंभराज याच्याकडे मोठ्या आवाजाने का भांडण करीत आहेस एवढीच विचारणा केली. याचा राग शंभुराज याला आल्याने त्याने डॉ. नंदलाल यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. जखमी अवस्थेत 69 वर्षीय डॉ. नंदलाल हे रुग्णालयात जाऊन त्यांनी उपचार घेतले. त्यांनी शंभुराज याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात मारहाणीबाबत गुन्हा नोंद केला.