| कल्याण | प्रतिनिधी |
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करताना महावितरणच्या पथकाला मारहाण करण्याची घटना भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर येथे गुरुवारी (दि.21) घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पडघा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
अनिकेत बाळाराम जाधव (रा. पाच्छापूर, ता. भिवंडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. जाधव या ग्राहकाचे वीजबिल थकीत असल्याने अंबाडी शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ कुशल काकडे यांच्या पथकाने जाधव यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जाधव यांचा मुलगा अनिकेत याने वरिष्ठ तंत्रज्ञ काकडे व त्यांच्या समवेतच्या सुरक्षा रक्षकाला दमदाटी व मारहाण केली. काकडे यांच्या फिर्यादीवरून पडघा पोलिसांनी सरकारी कामात अडथळ्यासह आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महावितरण कर्मचार्यांना मारहाण व दमदाटीच्या गुन्ह्यात जबर शिक्षेची तरतूद आहे. सध्या मार्च अखेरमुळे कर्मचारी थकबाकीदांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करत आहेत. या कर्मचार्यांच्या कामात अडथळा न आणता त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.