। पनवेल । प्रतिनिधी ।
कर्जदाराने ऑटो रिक्षाचे हप्ते न भरल्याने जामीनदार मित्राचे बँक खाते गोठवण्यात आले. त्यामुळे जामीनदार मित्राने हप्ते न भरलेल्या कर्जदार मित्राला घरात बांधून ठेवत मारहाण केली. याप्रकरणी जामीनदार मित्राविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकुर्ली, मालेवाडी येथे राहणारा अर्जुन बळे आणि वाजे येथील कुणाल भगत हे मित्र आहेत. 2018 मध्ये अर्जुन बळे यांनी रिक्षा खरेदीसाठी कर्ज घेतले. यावेळी कुणाल भगत हा जामीनदार राहिला. अर्जुनने वेळेवर हप्ते न भरल्याने बँकेने रिक्षा जप्त करून जामीनदार कुणाल भगतचे बँक खाते गोठवले. त्यामुळे कुणालला त्याचा राग आला. यावेळी कुणाल याने अर्जुन याला माझे बँक खाते चालू करून दे, असे सांगितले आणि त्यानंतर अर्जुनला वाजे येथील घरी नेले. त्या ठिकाणी त्याचे हातपाय खुर्चीला दोरीने बांधून त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दाखवून किडनी काढून विकण्याची धमकी दिली. याप्रकरणी अर्जुन याने खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कुणाल भगत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







