संमेलनात आगरी चळवळीतील आठवणी झाल्या जाग्या
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरणच्या काव्य दरबार या साहित्यिक संस्थेने आपली अनेक वर्षाची पोपटी काव्य संमेलनाची परंपरा जोपासत चिरले येथे पोपटी काव्य संमेलनाचे आयोजन केले होते. इतिहासचार्य तथा काव्य दरबार संस्थेचे संस्थापक के. एम. मढवी यांच्या निवासस्थानातील भव्य प्रांगणात हे पोपटी काव्य संमेलन जिल्ह्यातील कवींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. प्रथेप्रमाणे यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा व्यक्तिमत्त्वांचा काव्य दरबार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी रामचंद्र म्हात्रे यांनी भूषविले होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश ठाकूर, नाटककार, चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक म.वा.म्हात्रे, ज्येष्ठ कवी काशिनाथ मढवी, कवी अरुण द. म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
आरंभी इतिहासचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक के.एम. मढवी, कवी भ.पो.म्हात्रे, गुरुवर्य म. वा.म्हात्रे,सुगम संगीत गायिका मनस्वी माळी, अध्यापिका मिनाक्षी मुंबईकर, समाज सेविका वंदना घरत, आदर्श शिक्षक बळीराम पाटील,कवी शिवाजी मोकल, कीर्तनकार गोविंद घरत, कवी मारुती बागडे, साहित्यिक गजानन म्हात्रे या व्यक्तिमत्त्वांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मनस्वी माळी या तरुणीने संस्कारांची जपणूक करणाऱ्या आगरी धवले गीतांचे सादरीकरण करून, आगरी चळवळतील आठवणी ताज्या करून दिल्या.
यावेळी घेण्यात आलेल्या पोपटी कवी संमेलनात अस्सल गावरान आगरी कवितांच्या सुंदर अदाकारीतून आगरी संस्कृती आणि संस्कार यांचे श्रोत्यांना समग्र दर्शन झाले. कविसंमेलनात मनोज पाटील, जयपाल पाटील, मोहन पाटील, हिरामण पाटील, शाहीर अनंत पाटील, दिलीप मोकल, प्रकाश पाटील, गणपत म्हात्रे, हरिश्चंद्र माळी, लवेंद्र मोकल, सोमनाथ घरत, संदेश दरणे, मृग्मय माळी, स्वरा माळी अशा एकूण 40 कवींनी भाग घेतला होता. कवयित्री मिनल माळी आणि कवी राजेंद्र नाईक यांच्या रसाळ निवेदनातून कवींनी कवी संमेलनाचा आनंद अनुभवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काव्य दरबार संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी तसेच काशिनाथ मढवी यांच्या कुटुंबियांनी विशेष मेहनत घेतली.







