वटसावित्री पुजनावेळी सुवासिनींवर मधमाशांचा डंख

11 महिलांसह एका पुरुषालाही घेतले कडकडून चावे

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील चांभारगणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील निवे गावामध्ये सकाळी वटसावित्री पूजनावेळी वटवृक्षाभोवती जमलेल्या 11 सुवासिनींना मधमाशांचे मोहोळ उठून असंख्य मधमाशांनी कडकडून चावे घेतल्याची घटना शुक्रवारी (दि.21) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी एका पुरुषालादेखील मधमाशांनी कडाडून चावे घेतले. या सर्व 12 मधुमक्षिका डंखाच्या रूग्णांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये रूग्णवाहिकेने दाखल करण्यात आले असून, सर्वांच्या तब्येतील सुधारणा होत आहे.

पोलादपूर तालुक्यात सर्वत्र सुवासिनींचा वटसावित्रीपूजनाचा सण आनंदात आणि उत्साहामध्ये सुरू असताना अचानक पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये तब्बल 11 महिला आणि 1 पुरूष असे 12 जण मधमाशांच्या डंखाने बेजार झाल्याने दाखल करण्यात आल्याची माहिती थडकली. या बातमीने ग्रामीण भागातील सर्वच जण प्रचंड हवालदिल झाले. निवे गावातील वटवृक्षाखाली पाच-सहा महिलांची पूजा झाल्यानंतर आणखी चार पाच जणी वटवृक्षाखाली पूजेसाठी जमल्या. यामुळे सर्वांच्या पूजेनंतर नारळ फोडण्यासाठी महिलांनी साधारण 100 फूट अंतरावर शेतात बांधांवरील गवताची बेणणी करणार्‍या अनंत नाना तळेकर यांना हाक मारून बोलावून घेतले. यावेळी अनंत तळेकर यांनी नारळावरील सालं काढून तो फोडण्यासाठी आपटणार तोच हजारो मधमाशांनी त्यांना वेढले आणि चावे घेण्यास सुरूवात केली. यावेळी महिलांनादेखील मधमाशांनी डंख करण्यास सुरूवात केली. अशा अवस्थेत अनंत तळेकर यांनी जवळच्या मंदिरामध्ये सर्व महिलांना जाण्यास सांगून मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिराचा दरवाजादेखील बंद करून घेतला. मात्र, तोपर्यंत महिलांना मधमाशांनी डोक्यावरील केसांमध्ये, चेहर्‍यावर तसेच हातावर आणि मानेवर दंश केल्याने सर्वांनाच वेदना असह्य होऊन त्या मंदिरामध्ये लोळू लागल्या. यानंतर काही वेळाने मधमाशा पांगल्या आणि अनंत तळेकर आणि सर्व महिलांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये सर्व 12 जणांना 108 आणि 102 रूग्णवाहिकेने दाखल केले. यावेळी 108 रूग्णवाहिकेवरील डॉ. नागरे आणि चालक निकम तसेच 102 वरील चालक किरण कळंबे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून रूग्णांना स्थानिक तरूणांच्या मदतीने पोलादपूर रूग्णालयामध्ये आणण्याकामी तत्परता दाखविली.

पोलादपूर ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय सहकार्‍यांनी सुहासिनींपैकी वनिता बबन चिकणे, कविता नितीन चिकणे, दिपाली सचिन चिकणे, पार्वती भाऊ तळेकर, ज्योती जगदीश तळेकर, अनुसया गणपत तळेकर, सुशिला विश्‍वनाथ तळेकर, शेवंती पांडुरंग तळेकर, भारती बाबाजी तळेकर, गीता ज्ञानेश्‍वर तळेकर, शैला अनंत तळेकर आणि अनंत नाना तळेकर यांच्यावर तातडीने मधुमक्षिका डंखावरील उपचार सुरू केले. यानंतर सर्वांच्या प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय परिचारिकांनी सांगितले आहे.

Exit mobile version