। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चौल येथे महाराष्ट्र शासन व कृषक कल्याणकारी संस्था चौल यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमक्षिका पालन प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. तुकाराम निकम यांनी प्रशिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दुसर्या हरित क्रांती सोबत मधूक्रांती यशस्वी होण्यासाठी परागीभवनाची नित्यांत आवश्यकता आहे. फळपिकांमध्ये शास्त्रीय मधमाश्यापालन प्रशिक्षण घेऊन शेतीला पुरक असा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, कृषक कल्याणकारी संस्था चौलचे संस्थापक रविंद्र पाटील यांनी प्रशिक्षितांना मधमाश्यांच्या जाती, वसाहत, त्यांच्यातील घटक, घटकांची कार्ये, मधमाश्यांचा जीवनक्रम या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. अलिबाग तालुका कृषी अधिकारी भगत व मंडळ अधिकारी सुर्यवंशी यांनी शासनाच्या मधुमाक्षिका पालन विषयी असलेल्या विविध योजनांची माहिती प्रशिक्षीतांना दिली. तसेच, खादीग्रामोदयोग कवडे यांनी खादी ग्रामोदयोग विभागाच्या विविध योजनांची माहिती सांगितली. या कार्यक्रमाला डॉ. तुकाराम निकम यांच्यासह तालुका कृषी अधिकारी भगत, मंडळ अधिकारी सुर्यवंशी, खादीग्रामोदयोग कवडे, कृषक कल्याणकारी संस्थेचे संस्थापक रविंद्र पाटील, विद्यमान अध्यक्ष प्रमोद पाटील, प्रकाश पाटील, प्रविण नाईक, दिलिप पाटील, कृषक कल्याणकारी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, शेतकरी व बागायतदार हे उपस्थित होते.