भातबियाणे खरेदीची लगबग

जिल्ह्यात आतापर्यंत दहा टक्के खरेदी


। अलिबाग । प्रमोद जाधव |

मान्सूनने केरळात वर्दी देताच शेतकर्‍यांनी भात बियाणे खरेदीला सुरुवात केली असून, जिल्ह्यातील बियाणे, खत विक्री केंद्रात खरेदीची लगबग सुरु झाली आहे. आतापर्यंत दहा टक्के खरेदी झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये भाताचे 98 हजार 919 हेक्टर क्षेत्र असून, जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक भात उत्पादक शेतकरी आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी धूळवाफे पेरणीची लगबग सुरू झाली असून, काही ठिकाणी बियाणे खरेदीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण क्षेत्रापैकी दहा टक्के क्षेत्रामध्ये बियाणांची लागवड केली जाणार आहे. त्यानुसार कृषी विभागाने 16 हजार 250 क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी 25 मेपर्यंत 8 हजार 400 क्विंटल भात बियाणे उपलब्ध झाले आहे. बियाणांबरोबरच खतांचीदेखील गरज निर्माण होणार आहे. त्यामुळे 17 हजार मेट्रिक टन इतक्या खताची मागणी केली आहे. त्यात 11 हजार 500 मेट्रिक टन युरीया खताची मागणी केली आहे. परंतु, आतापर्यंत एक हजार 920 मेट्रिक टन खताचा पुरवठा जिल्ह्याला झाला आहे. आठ दिवसांमध्ये मागणीनुसार बियाणांसह खतांचा पुरवठा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 196 भात बियाणे विक्री केंद्र व 290 खत विक्री केंद्र आहेत. या विक्री केंद्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बियाणे व खत विक्रीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत दहा टक्के बियाणांची विक्री झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

विक्रेत्यांवर भरारी पथकाची नजर
जिल्ह्यामध्ये भात विक्रीबरोबरच खत विक्री केंद्र सुरु केले आहेत. या केंद्रातून बियाणे खरेदीला सुरुवात झाली आहे. मान्यताप्राप्त दुकानांमधून शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहेत. त्यानुसार शेतकरी विक्री केंद्रातून बियाणे खरेदी करीत आहेत. मात्र, शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या विक्री केंद्रावर 17 भरारी पथकाची नजर राहणार आहे. त्यात तालुका स्तरावर 15 व जिल्हा स्तरावर दोन भरारी पथकांचा समावेश आहे. पावती न देणे, किंमत अधिक घेणार्‍या विक्रेत्यांवर या पथकामार्फत कारवाई केली जाणार आहे.
मान्यता नसलेल्या दुकानांवर होणार कारवाई
रायगड जिल्ह्यामध्ये भात बियाणे, खत खरेदीला सुरुवात झाली आहे. खत, बियाणे खरेदीसाठी मान्यता प्राप्त विक्री केंद्र सुरु केले आहेत. मात्र काही किराणा दुकान व अन्य दुकानांमधून राजरोसपणे खत विक्री केले जाते. त्यामुळे शेतकर्‍यांकडून आर्थिक लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच भरारी पथकामार्फत मान्यता नसलेल्या दुकानांवरदेखील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
खत खरेदी करताना आधारकार्ड गरजेचे
जिल्ह्यामध्ये भात बियाणांबरोबरच खताचीदेखील मागणी अधिक आहे. शेतकर्‍यांना युरिया, 15ः15ः सुफलासारखी खते अनुदानातून दिली जाणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी खत खरेदी करताना आधारकार्ड सोबत घेऊन जावे, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे.

भात खरेदीला सुरुवात झाली आहे. बियाणांसह खतेदेखील उपलब्ध झाली आहेत. शेतकर्‍यांना भात पेरणीसाठी बियाणांचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली आहे. खतांबाबतही नियोजन केले आहे. शेतकर्‍यांनी मान्यता प्राप्त दुकानांमधूनच खत व बियाणे खरेदी करावे.

मिलिंद चौधरी,
कृषी अधिकारी,
कृषी विभाग,
रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version