लाडक्या बहीणींची बँकेत गर्दी; कर्मचार्‍यांची झाली दमछाक

। पाली । वार्ताहर ।

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांची धावपळ वाढली आहे. त्यासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी तहसील कार्यालय व सेतू केंद्रावर काही दिवस मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शासनाकडून माझी लाडकी बहीण या योजने करिता महिना पंधराशे रुपये मिळणार आहेत. या साठी महिला कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करीत आहेत.

पंधराशे रुपये जमा होण्याकरिता बँक खाते आवश्यक असल्याने शासनाकडून महिलांना मोफत झिरो बॅलन्स खाते उघडून देण्यात येत आहेत. यासाठी सोमवारपासूनच पालीतील बँकांमध्ये बँक खाते उघडण्यासाठी महिलांची तुफान गर्दी बघायला मिळाली. मात्र यामध्ये बँक कर्मचार्‍यांची दमछाख झाली. योजनेसंबंधी महिलांसोबतच दैनंदिन व्यवहार करणारे, पेन्शनधारक तसेच इतर कामांसाठी देखील नागरिक बँकेत आले होते. त्यामुळे बँक कमरचार्‍यांची पुरती धांदल उडाली.

सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असल्याने मोठ्या प्रमाणावर आदिवासी व दूरच्या अंतरावरुन खेडोपाड्यातून महिला बँकेत आल्या होत्या. आपलं काम लवकर व्हाव व उद्या पुन्हा यावं लागू नये या आशेने महिला घाई करत होत्या. बर्‍याच महिलांना बँकेतील फॉर्म भरता येत नसल्याने याचा ताण कर्मचार्‍यांवर आला. मात्र तरीसुद्धा कर्मचार्‍यांकडून महिलांना सहकार्य केले.

Exit mobile version