आमदार दळवींकडून महिलेला भूमीहीन करण्याचा डाव
| खास प्रतिनिधी | रायगड |
राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवून महिलांचे सबलीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे सरकारी यंत्रणेवर दबाव टाकून एका महिलेला भूमीहीन करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, आमदार महेंद्र दळवी यांच्याच शिवसेना पक्षातील छाया चंद्रकांत पिंगळे असून, त्यांच्याकडे रायगड जिल्हा महिला संपर्क संघटकपदाची दबाबदारी आहे. जे सरकार स्वतःच्याच पक्षातील महिलांवर अन्याय करत असेल, तर ते अन्य महिलांना काय न्याय देणार, असा सवाल त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अलिबाग तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायतीमधील नवखार येथे छाया चंद्रकांत पिंगळे यांची 144 गुंठे सामायिक जमीन आहे. सदरच्या जमिनीची मालकी छाया पिंगळे यांच्याकडे आहे. अन्य ठिकाणची स्मशानभूमी हलवून ती चार महिन्यांपूर्वी आमच्या जमिनीमध्ये बांधण्यात आल्याचे छाया पिंगळे यांनी सांगितले. त्याचे लोकापर्णदेखील आमदार दळवी यांच्या उपस्थितीत झाले होते. याला आम्ही विरोध केला, मात्र त्याला आमदारांनी जुमानले नाही. आता तर डोंगरी विकास अंतर्गत याच जमिनीतून स्मशानभूमीसाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, मतांसाठी राजकारण सुरु असल्याकडे पिंगळे यांनी लक्ष वेधले. जमीन आमची असतानादेखील आमदारांची दादागिरी सुरु आहे. सरकारी यंत्रणांवर दबाव आणून सध्या मतदारसंघात कारभार चालला असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार आम्हाला न्याय देणार का, अशी आर्त विनवणी त्यांनी केली आहे.
मुळात, सरकारी योजना पूर्ण करण्यासाठी सरकारी जमीन आवश्यक असते. खासगी जमिनीवर विकासकामांसाठी निधी खर्च करता येत नाही. असे असतानादेखील डोंगरी विकास योजनेतून निधी कसा मंजूर झाला, हादेखील प्रश्न आहे.