। लंडन । वृत्तसंस्था ।
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात अनेक मोठे विक्रम होत आहेत. मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंड संघात पदार्पण करणार्या गस ऍटकिन्सनने 7 विकेट घेत 48 वर्षे जुना विक्रम मोडला. त्याचवेळी संघाचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसनही शेवटचा सामना खेळत आहे. अँडरसन 700 हून अधिक बळी घेणारा आणि 40 हजारांहून अधिक चेंडू टाकणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. आता संघाच्या कर्णधारानेही एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
स्टोक्सने वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटीतील पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणार्या मायकेल लुईसला बाद केले. स्टोक्सने 8 षटकांत केवळ 14 धावा दिल्या. दुसर्या डावातही कर्क मॅकेन्झीला पहिल्याच षटकात बाद केले. त्यानंतर लुईसचीही विकेट घेतली. स्टोक्सची बॅट शांत असली तरी तो चेंडूने मात्र जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे.
बेन स्टोक्सने पहिल्या कसोटीतील दुसर्या डावात वेस्ट इंडिजचा खेळाडू कर्क मॅकेन्झीची विकेट घेतली. बेन स्टोक्सच्या कसोटी कारकिर्दीतील ही 200वी विकेट होती. स्टोक्सने 103 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या कारकिर्दीत एकूण 103 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 6320 धावा आणि 200 विकेट घेतले आहेत. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला आणि जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 6000 हून अधिक धावा करणारा आणि 200 हून अधिक विकेट घेणारा पहिला खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचे महान खेळाडू सर गॅरी सोबर्स आहेत. सर गॅरी सोबर्स यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 93 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 8032 धावा आणि 235 विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर गॅरी सोबर्स यांच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसनच्या नावावर ही कामगिरी आहे. जॅक कॅलिसने आपल्या कारकिर्दीत 166 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 13289 धावा आणि 292 विकेट्स घेतल्या.







