लाभार्थ्यांना मिळणार शिबीराचा आधार

संजय गांधी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

| अलिबाग | प्रतिनिधी |

शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ गरजूंना, गोरगरींबाना व वंचित घटकाला मिळावा यासाठी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेसह वेगवेगळ्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरातून लाभार्थ्यांना मिळणार योजनांचा आधार मिळणार आहे.
विशेष सहाय्य योजने अंतर्गत, वयोवृध्द, विधवा, निराधार, दुर्धर आजार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, वंचित घटक तसेच वेगवेगळ्या स्वरुपाच्या दिव्यांगाना उभारी देण्यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवनेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुटूंबलाभ अर्थसहाय्य योजना सुरु करण्यात आल्या आहेत.

या योजनांच्या माध्यमातून गरजूंना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमातून संजय गांधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी त्यांच्या गावातच शिबीरांचे आयोजन सुरु केले आहे. दहा जूलैपासून मापगाव येथे शिबीर घेऊन हा नाविन्य उपक्रम अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आला. त्यानंतर परहूर, चौल- रेवदंडा, आक्षी या ठिकाणी शिबीर घेण्यात आले आहे. या शिबीरातून सुमारे 20 जणांनी योजनेसाठी अर्ज भरले आहेत. तसेच किहीम, झिराड या ठिकाणी 18 जूलै रोजी किहीम येथील मंडळ अधकारी कार्यालय, 21 जूलै रोजी पोयनाड येथील जिल्हा परिषद मराठी शाळा याठिकाणी शिबीर घेऊन संजय गांधी योजनेअंतर्गत येणाऱ्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील लाभार्थ्यांनी या शिबीरातून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन अलिबाग तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागाच्या नायब तहसीलदार मानसी पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version