| मुंबई | वृत्तसंस्था |
पटना पायरेट्स आणि बेंगलुरु बुल्स या संघामध्ये सोमवारी (दि. 8) सामना खेळवला गेला. या चित्त थरारक सामन्यात बेंगलुरु बुल्स संघाने शेवटच्या मिनिटाला विजय मिळवला. या विजयात डिफेंडर सुरजीत सिंग याचा मोलाचा वाटा होता.
दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बेंगळुरू बुल्स संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पटना पायरेटस संघावर 34-33 असा थरारक विजय मिळवला. बेंगळुरू बुल्सकडून डिफेंडर सुरजीत सिंग(8गुण) याने तर, पटना पायरेटस कडून कर्णधार नीरज कुमार(5गुण) याने सुरेख कामगिरी केली.
दोन्ही संघांनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला व तिसऱ्या मिनिटाला 3-3 अशी बरोबरी होती. मात्र, 14व्या मिनिटाला पटना संघाने जोरदार खेळ करत बेंगळुरू बुल्सवर पहिला लोन चढवला व सामन्यात 16-8 अशी आघाडी मिळवली.
मध्यंतराला बेंगळूरु संघाने सुशील आणि रक्षित यांना संधी दिली. पण त्यांना संधीचे सोने करता आले नाही. 27व्या मिनिटाला विकास कंडोलाची नीरजने पकड करून पटना संघाची आघाडी 10 गुणांच्या फरकाने 24-14 अशी वाढवली. बेंगळूरुकडून सचिन नरवालने सुरेख खेळ करून संघाला गुण मिळवून दिले. तर, सुरजीतच्या हाय 5 गुणामुळे ही आघाडी आणखी कमी झाली. पण पटनाकडून सचिनने सुपर रेड करताना संघाला 3 गुण मिळवून दिले.
पिछाडीवर असलेल्या बेंगळूरु बुल्सच्या सुरजीत आणि रान सिंग यांनी सुपर टॅकल करून संघाचे आव्हान कायम राखले. सामना संपण्यास तीन मिनिटे शिल्लक असताना बेंगळूरु बुल्स 33-25 असा आठ गुणांच्या फरकाने पिछाडीवर होता. बेंगळूरु संघाच्या सुशीलने महत्वपूर्ण दोन गुण मिळवले. यावेळी पटना संघाचा एकच गडी मैदानात होता. सूरजीतने संदीप कुमारला सुपर टॅकलकरून पटना संघावर मोक्याच्या क्षणी लोन चढविला व संघाला एक गुणाने आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवत बेंगळूरु बुल्स संघाने पटना पायरेटसवर विजय मिळवला.
बेंगलुरु बुल्सचा शेवटच्या मिनिटाला विजय
