बंगळुरूचा गुजरातवर ‌‘रॉयल’ विजय

सलग पाच विजयांसह पात्र फेरीत

| वडोदरा | वृत्तसंस्था |

महिला प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात जायंट्सवर विजय मिळवत गुणतालिकेतील आपले वर्चस्व कायम राखले आहे. बंगळुरूने वडोदरा येथील सामन्यात गुजरातवर 61 धावांनी विजयाची नोंद केली आहे. सलग 5 विजयांसह प्ले ऑफमधील आपले स्थान देखील बंगळुरूने पक्के केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 178 धावा केल्या. यावेळी सलामीच्या जोडीला पुन्हा अपयश आले. ग्रेस हॅरिस व जॉर्जिया व्हॉल या दोघीही 1 धावेवर बाद झाल्या. कर्णधार स्मृती मानधना 26 धावांवर पायचीत झाली. परंतु, गौतमी नाईक आणि रिचा घोष यांनी संघाला स्थिरता दिली. या दोघींनी चौथ्या बळीसाठी 67 धावांची भागीदारी केली. रिचा 20 चेंडूंत 27 धावांवर माघारी परतली. गौतमीनेही 55 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 73 धावा केल्या. राधा यादवने 8 चेंडूंत 17 धावांचे योगदान दिले. यावेळी गुजरातच्या काश्वी गौतम व ॲश गार्डनर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

परंतु, बंगळुरूने दिलेल्या धावांचा पाटलाग करताना गुजरातला 8 बाद 117 धावाच करता आल्या. सायली सातघरेने गुजरातच्या दोन्ही सलामीच्या खेळाडूंना माघारी पाठवले. त्यांचे 3 फलंदाज 5 धावांत तंबूत परतले होते. कर्णधार गार्डनरने 54 धावांची खेळी करून संघर्ष केला; परंतु, तिला साथ मिळाली नाही. यावेळी बंगळुरूच्या सायलीने 3, तर नॅडीने डे क्लेर्कने 2 बळी घेतले.

यंदाच्या महिला प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 5 सामन्यांत 5 विजयांसह 10 गुण मिळवून प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स व गुजरात जायंट्स हे 5 सामन्यांनंतर प्रत्येकी 2 विजय मिळवून 4 गुणांसह शर्यतीत आहेत. दिल्ली कॅपिटल्सला 4 सामन्यांत फक्त 1 विजय मिळवात आला आहे.

Exit mobile version