। मुंबई । प्रतिनिधी ।
सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द येथे सोमवारी (दि.20) सकाळी एक भीषण अपघात झाला. बेस्टची भरधाव बस थेट दुभाजकावर आदळल्याने, तिथे उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात बसचे चालक-वाहक आणि अन्य 5 प्रवासी असे एकूण 7 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मानखुर्द येथील विश्वकर्मा रुग्णालयासमोर हा अपघात घडला. बेस्टची बस सायन-पनवेल महामार्गावरून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट दुभाजकावर जाऊन धडकली. अपघात झाला त्यावेळी 65 वर्षीय भास्कर पांडे हे महामार्ग ओलांडण्यासाठी दुभाजकाजवळ उभे होते. बस थेट दुभाजकावर आदळल्याने पांडे यांना जोरदार धडक बसली. त्यांना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या भीषण अपघातात बसचे चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा (51) आणि वाहक वैभव वाघमारे (41) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर बसमधील जखमी झालेल्या इतर 5 प्रवाशांना तातडीने गोवंडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांमध्ये शिवमंगल मैती (42), गणेश पटेल (24), लता वाघेला (43),राजेश वरुगामिना (35), अंकिता जाधव (22) यांचा समावेश आहे. या पाचही जणांवर रुग्णालयाच्या अपघात विभागात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे. मानखुर्द स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सायन-पनवेल महामार्गावर बेस्ट बसचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू
