खा.विनायक राऊत यांचे आश्वासन
। चिपळूण । प्रतिनिधी ।
महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूरमुक्त चिपळूणसाठी सर्वोत्तोपरी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन खा.विनायक राऊत यांनी दिले आहे. चिपळूण येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसारमाध्यमांसह संवाद साधला आहे.
या संवादात खा.राऊत म्हणाले की, चिपळूणमधील नागरिकांना, व्यावसायिकांना भविष्यात पुराच्या पाण्यापासून वाचविण्यासाठी प्रशासनाचे आणि आमचे प्रयत्न सुरू आहेत. चिपळूणला लवकरच गाळमुक्त करुन पूराच्या धोक्याचे सावट नष्ट करणार आहोत. यासाठी सर्व खात्यातील शासकीय यंत्रणा आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सातत्याने लक्ष ठेऊन वाशिष्ठी, शिवनदी मधील गाळ काढणेकामी सहकार्य करीत आहेत. तसेच वरिष्ठ स्तरावर लागणारे सहकार्य आमच्या माध्यमातून सुरू असल्याचे प्रतिपादन खा.राऊत यांनी केले.
पूरमुक्त चिपळूणसाठी चिपळूण बचाव समितीमार्फत करण्यात आलेल्या जनआंदोलनाला यश मिळाले असून, वाशिष्ठी आणि शिवनदीमधील गाळउपसा कामास सुरुवात करण्यात आली आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी खा.विनायक राऊत यांनी मंत्री उदय सामंत, आ.शेखर निकम, माजी आ.सदानंद चव्हाण, माजी नगरसेवक शिरीष काटकर यांच्यासह करत, संबंधित कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी खास गाळउपसासंदर्भात नागरीकांनी प्रशासनाला सुचविलेल्या कामांविषयी आढावा बैठक घेऊन अधिकारी आणि प्रशासनाला सूचना केल्या.याशिवाय पेठमाप भाटाण येथे वनरक्षक भिंत बांधण्यात यावी या मागणीचे पत्र पेठमाप येथील नागरिकांनी खा.विनायक राऊत यांना दिले. यावेळी पाटबंधारे खात्याच्या अधीक्षक अभियत्या वैशाली नारकर, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, तहसीलदार जयराज सुर्यवंशी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सचिन कदम, प्रतापराव शिंदे, उमेश सकपाळ, मनोज शिंदे, सुयोग चव्हाण, विकी नरळकर, अँड. प्रसाद चिपळूणकर, जलसंपदा उपविभागीय अभियंता खोत, यांत्रिकी विभागचे जाधव, शाहनवाज शाह, महेंद्र कासेकर, अनंत मोरे, प्रमोद ठसाळे, समीर जानवलकर आदी उपस्थित होते.
- विविध ठिकाणी पाहणीगाळउपसा कामाची पाहणी करताना चिपळूण शहरातील बायपास कोल्हे खाजण येथील शिवनदी, उक्ताड मैदान, नाईक कंपनी बाजारपेठ पुल, पेठमाप वाशिष्टी नदी, भाटण, शंकरवाडी, नलावडे बंधारा, बहादूरशेख वाशिष्टी नदी अशा विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट खा.विनायक राऊत, आ.शेखर निकम तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांनी पाहणी केली.
- महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूरमुक्त चिपळूणसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आमच्याकडून करण्यात येणार्या पाठपुराव्याला, महत्त्वाचे म्हणजे जनतेच्या मागणीला यश येवून गाळउपसा कामास सुरुवात झाली आहे. आणि याकामी महाविकास आघाडी सरकार योगदान देत असल्याने आनंद आहे. – आ. शेखर निकम, चिपळूण