भाव घसरल्याने सुपारी बागायतदार नाराज

गेल्या वर्षीपेक्षा दर मणास दोनशे रुपये कमी

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळात जमीनदोस्त झालेल्या वाड्यांमुळे सुपारी बागायतदार हळूहळू आता कुठे पूर्वपदावर येत आहे. असे असताना सुपारीच्या भावात घसरण झाल्याने ऐन गणेशोत्सवाच्या काळात बागयतदार नाराज झाले आहेत. मुरुड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघातर्फे यावर्षी सुपारीला 6,200 रुपयांचा भाव जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपेक्षा दर मणास (1 मण-20 कि.ग्रॅ) दोनशे रुपयांनी कमी भाव असल्याने संघाच्या सदस्यांतून नाराजीचा सूर आहे. गतवर्षी हाच दर 6,400 रु. दर मणास सदस्यांना मिळाला होता. दि.16 ऑगस्टच्या झालेल्या सन 2022 च्या असली सुपारी हिशोबाच्या विशेष साधारण सभेत संघातर्फे दर मणास 5950 रु. इतका भाव जाहीर करण्यात आला होता. परंतु, सदर सभेत सदस्यांनी त्यास कडाडून विरोध केला होता. भावास मान्यता देण्याचा ठराव फेटाळून लावला होता. किमान गेल्या वर्षीचा रु.6400चा तरी भाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सुधारीत भाव पुन्हा जाहीर करण्यात येणार असल्याचे संघातर्फे सांगण्यात आले होते.

सन 2022 मध्ये सुपारी संघाकडे एकूण 409 खंडी असोली सुपारी जमा झाली होती.दरमणी 362 रु. खर्च वजा जाता सदस्यांना सहा हजाराचाही भाव मिळणार नाही. 28 ऑगस्टपासून सभासदांना पैसे वाटपास सुरुवात झाली आहे. चालू हंगामात संघाकडे 634 खंडी (1 खंडी-20 मण) सुपारी जमा आहे. सध्या निवड करुन तिची विक्री केली जात असून, येथील चांगल्या श्रीवर्धनी रोठा सुपारीला गुजरात-सूरत येथून चांगली मागणी आहे. मागील संचालकांनी सरसकट ऑनलाईन विक्री पद्धतीने सुपारीची विक्री केली होती. तरीही तिला चांगला भाव मिळाला होता. यावर्षी सर्वच वस्तुंच्या किमतीत वाढ झाली असताना, सुपारीला मात्र दर कमी मिळाल्यामुळे अनेक सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वीच संघाच्या संचालकांची निवडणूक प्रक्रिया पार पडून नवीन संचालक मंडळ स्थापन झाले आहे.

Exit mobile version