रोगांच्या अडकित्त्यात अडकली सुपारी

यंदा उत्पादनात घट होण्याची शेतकऱ्यांना भीती

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे भात पीकाबरोबरच नारळ आणि सुपारीचे पीक उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. सध्या सुपारीच्या झाडांवर विविध रोगांचा प्रार्दुभाव होत आहे. सुपारीचे पीक धोक्यात आल्याने उत्पादनात घट होण्याची भीत शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे सुपारी बागायतदार आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.

मुरुड तालुक्यात जवळपास 416 हेक्टर जमीनीवर सुपारीची लागवड करण्यात आली आहे. निसर्ग व अन्य वादळात त्यातील 142 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. सन 2019 मध्ये येथील सुपारी खरेदी व विक्री संघात 725 खंडी (एक खंडी म्हणजे 400 कि.ग्रॅ.) म्हणजे 2 लाख 90 हजार कि.ग्रॅ.सुपारी फळांचे उत्पादन झाले होते. सभासदांना दर मणास (20 कि.ग्रॅ.) 4120 रुपये भाव मिळाला होता. सन-2021 मध्ये 278 खंडी म्हणजे 1 लाख 11 हजार दोनशे कि.ग्रॅ तर दर मणास 7520 रुपये भाव मिळाला होता, तर सन 2022 मध्ये 409 खंडी म्हणजे 1 लाख 63 हजार सहाशे कि.ग्रॅ. सुपारीचे उत्पादन झाले होते. त्याला 6200 रुपये भाव मिळाला होता. सन2023 मध्ये जवळपास 634 खंडी म्हणजे 2 लाख 53 हजार सहाशे कि.ग्रॅ.चे उत्पादन झाले आहे. ही सुपारी बाजारात विक्रीसाठी गेली असून तिला इंडोनेशिया, सिंगापूर आदी देशात मागणी आहे. श्रीवर्धनची सुपारी चवीला कमी असली, तरी ती आकाराने मोठी आहे. मुरुडच्या सुपारीला श्रीवर्धनच्या सुपारी बरोबर स्पर्धा करावी लागत आहे.

निसर्ग व अन्य वादळांनी येथील सुपारीची चांगली उत्पन्न देणारी जुनी झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे सुपारीचे उत्पादन साफ घसरले आहे. ती झाडे आहेत त्यांना विविध रोगांनी ग्रासले आहे. सुपारी झाडाच्या बुडाशी आळंबी नावाचा रोग होतो. या रोगाच्या आळ्या झाडाच्या बुंध्याला पोखरतात व रस शोषण करतात. परिणामी लहान मोठी झाडे उभीच वाळून जातात. येथील बागायतदार गंधकाची पावडर झाडाच्या बुडाशी टाकतात परंतु तिचा काहीही परिणाम होत नाही. ज्या बागेतून पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साठते तेथे आळंबी रोग मोठ्या प्रमाणात आढळतो. संतधार पावसामुळे कोवळ्या सुपारी फळांना कोळे रोगाची लागण होते. या रोगाने मोठ्या फळांना बुरशी पकडून त्यांची गळ सुरू होते. महिनाभरात हा रोग सर्व झाडांच्या फळांवर पसरतो आणि सर्व सुपारी फळांची गळ होऊन बागायतदाराचे मोठे नुकसान होते.

सध्याच्या वातावरणातील बदलामुळे वाढलेली उष्णता सुपारीच्या छोट्या रोपांना त्रासदायक ठरत आहे. या उष्णतेमुळे रोपांवर करपा रोग पडण्यास सुरुवात झाली असून या रोगांनी रोपांच्या छोट्या कोवळ्या झावळ्या करपत आहेत. रोपांची वाढ खुंटून ते उभेच सुकते. एका नव्या रोगाने सुपारीवर नवीन संक्रांत आली आहे. याशिवाय मुंग्या, उंदीर, खारी, भुंगे, वटवाघळे आदी सुपारीच्या फळांना व्यवस्थित वाढून देत नाहीत. सुपारी फळ हे संत्री, मोसंबी, द्राक्षे, कापूस,उस अशा पिकात मोडत नसल्याने सरकारी मदतही मिळणे दुरापास्त होते.

Exit mobile version