पेणमधील फार्म हाऊसेसमधून आयपीएलचा सट्टा?

| पेण | प्रतिनिधी |
अलीकडच्या काळात पेण तालुक्याच्या पूर्व विभागामध्ये पेण-खोपोली मार्गावर फार्म हाऊसच्या संख्येत वाढ झाली आहे. यातील फार्म हाऊसवर अवैध धंदे चालतात, असे बोलले जाते. उद्योगपती, रेतीसम्राट, मातीसम्राट, धनदाडंगे व्यावसायिक, आंबटशौकीन राजकारणी, धान्यांची अफरातफर करणारे इत्यादी अनेक जण जीवाची मुंबई करायला इथे येत असतात.

शनिवार-रविवार या भागातील फार्म हाऊस तर हाऊसफुल्ल असतात. या फार्म हाऊसवर मुंबई, ठाणे या महानगरातून बारबालांना बोलावून पहाटेपर्यंत नाचगाण्यांचेही कार्यक्रम होतात, असा स्थानिकांचा दावा आहे. या कार्यक्रमामध्ये रम, रमा, रमी यामध्ये अनेक आंबटशौकीन बुडालेले असतात. तसेच निम्म्यापेक्षा जास्त फार्म हाऊसवर महावितरण कंपनीच्या नजरा चुकवत चोरीच्या विजेचा वापर केला जातो, असा संशय आहे. मात्र, याबाबत कोणतीही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.

आयपीएलमुळे बेटिंगचा धंदा जोरात
शुक्रवारपासून सुरु झालेल्या आयपीएलचा ज्वर अबालवृद्धांपर्यंत पोहोचला असला तरी पेण येथे वेगवेगळ्या फार्म हाऊसवर त्याची मजा लुटणारे जोरदार बेटिंग करुन प्रत्येक चेंडूवर बोली लावतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा प्रकार पुढील दोन महिने चालणार आहे. त्यामुळे शनिवार, रविवार तर या सट्टा खेळणार्‍यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याबाबत पोलीस व प्रशासन यावर्षी तरी कारवाई करणार का, अशी चर्चा या भागात चालू आहे.

Exit mobile version