| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रविकिरण हॉटेलमध्ये टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तीन इसमांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अँड्रॉ रिचर्ड फेर्नांडिस (38) रा. उत्तकर्ष नगर, दत्त मंदिर रोड, वाकोला पाईप लाईन, सांताक्रूझ पूर्व, मुंबई-55, मनिष दौलत टुकरेल (42) रा. नित्यानंद बिल्डिंग, फ्लॅट न 2, JP रोड, सेव्हन बंगलो, अंधेरी पश्चिम, मुंबई-58, राजेंद्र वडलदास भाटिया रा.1803 सिल्वर आर्च, शास्त्रीनगर, JP रोड, मुंबई अशी या आरोपींची नावे आहेत.
टी-20 वर्ल्ड कप साठी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान या दोन क्रिकेटच्या संघामध्ये अंतिम सामना झाला या सामन्यासाठी अलिबाग पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये असलेल्या रविकिरण हॉटेलमध्ये काही लोक सट्टा लावणार असल्याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रविकिरण हॉटेलमध्ये छापा टाकला असता, त्या ठिकाणी अँड्रॉ रिचर्ड फेर्नांडिस, मनिष दौलत टुकरेल हे वर्ल्डकप साठी चालू असलेल्या अंतिम सामन्यावर त्यांच्याकडील मोबाईल वर सट्टा लावून खेळत असल्याचे मिळून आले. मनिष टुकरेल याच्याकडील चौकशी मध्ये राजेंद्र भाटिया याने आपल्याला website, त्याची आयडी पासवर्ड दिला होता. त्यामुळे क्रिकेटवर सट्टा लावत होता हे निष्पन्न झाल्याने त्याल मुंबईतुन अटक केली आहे .
अँड्रॉ रिचर्ड फेर्नांडिस, मनिष दौलत टुकरेल या दोघांना दोन पंचा समक्ष पंचनाम्याने ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात रोख रक्कम 5370/-, 2 मोबाईल, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, इंडियन पोस्ट ATM कार्ड सापडले.
या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अलिबाग पोलीस स्टेशन येथे जुगार कायद्यानुसार आणि भारतीय तार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .