महाराष्ट्रासह बारा राज्यांना फटका
| नागपूर | प्रतिनिधी
‘मोचा’ हे चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये नवीन चक्रीवादळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सुमारे 12 राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषकरुन आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि ओडिशातील काही भागात अति मूसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पुढील काही दिवसांमध्ये यात वाढ होण्याची शक्यता आहे. तेलंगणा राज्यात पुढील तीन दिवस लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर भारतामधील डोंगराळ भागांमध्येही पुढील आठवड्याभरात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक भागांना येत्या काही दिवसात पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या खाडीमध्ये पश्चिम, मध्य आणि नैऋत्येला ही स्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ समुद्राच्या पाणी पातळीपासून 5.8 ते 7.6 किलोमीटरवर आहे.
पुढील 24 तासांमध्ये या स्थितीचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील या परिस्थितीमुळे तेलंगणा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्याच्या भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हीच ती राज्ये
हिमाचल प्रदेश, राजस्थानच्या पूर्वेकडील भाग, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटे, मराठवाडा, आंध्रप्रदेशची किनारपट्टी, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पॉण्डेचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशला आगामी काही दिवसांमध्ये पूराचा फटका बसण्याची शक्यता आहे.