दत्तमंदिराचे गुरव प्रभाकर आगलावेंचे भक्तांना आवाहन
| अलिबाग | वार्ताहर |
चौल पंचक्रोशीसह संपूर्ण जिल्हा आणि राज्यातील नागरिकांच्या श्रद्धास्थानी असणाऱ्या चौल-भोवाळे येथील स्वयंभू दत्तगुरुंच्या दर्शनासाठी दरदिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. सुट्ट्यांच्या दिवशी तर इथे गर्दीचं प्रमाण वाढलेले पाहायला मिळते. पण, याच दत्तमंदिरातील दत्तगुरुंच्या नावाखाली कोणी आर्थिक व अन्य गोष्टींची मागणी करीत असल्याचा संशय मंदिरातील पुजारी प्रभाकर आगलावे यांनी व्यक्त केला आहे. दत्तभक्तांची जर कोणी फसवणूक करीत असेल, तर अशा गोष्टींशी दत्त देवस्थानचा काहीही संबंध नाही, असेही श्री. आगलावे यांनी म्हटले आहे.
चौल-भोवाळे येथील दत्तमंदिर मल्लेश्वर महादेव व श्री दत्तस्वामी मंदिर, चौल नावे ट्रस्ट असून, या ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचा कारभार चालविला जातो. वर्षभर मंदिरात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातच नव्हे तर, राज्यभरात प्रसिद्ध असणारी दत्तजयंतीनिमित्त भरणारी यात्रा, गुरुपौर्णिमा उत्सव, श्रावण महिन्यातील दर गुरुवारी होणारे अन्नदान, वर्षभरात दर गुरुवारी विविध कार्यक्रम, दररोज पहाटे आणि सायंकाळी होणारी दत्तगुरुंची आरती आदी कार्यक्रमांचा सहभाग आहे. मंदिराचे पुजारी प्रभाकर आगलावे यांच्या पुढाकारातून मागील 29 वर्षांपासून आजतागायत हे कार्यक्रम पार पडत आहेत. श्री. आगलावे देवाचे पुजारी म्हणून गेली 40 वर्षे अखंडितपणे सेवा करीत आहेत. दरम्यान, श्रद्धेने येणाऱ्या भाविकांना त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन केले जाते.
दत्त देवस्थानच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरविणारे कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. परंतु, असे कार्यक्रम कोणी करीत असेल, तर त्याच्याशी दत्त देवस्थान आणि पुजारी म्हणून माझा काहीही संबंध नाही, असे श्री. आगलावे यांनी सांगितले. ते म्हणाले की, जर कोणी व्यक्ती, संस्था अथवा संघटना मुख्य दत्त देवस्थानच्या नावाने, दत्तगुरुंचा फोटो वापरुन देणगी किंवा इतर कोणत्याही गोष्टींची मागणी करुन भाविकांची फसवणूक करीत असतील, तर अशा कोणत्याही गोष्टींशी आमचा काहीही संबंध नाही. भक्तांनी आपली फसवणूक होऊ नये, याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहनही श्री. आगलावे यांनी केले आहे. जर एखाद्या भाविकाची फसवूणक झाली असेल, तर लेखी तक्रार मंदिरात करावी, असेही दत्त देवस्थानकडून सांगण्यात आले आहे.







