पाच दिवसांत दुपटीने वाढ; सात तालुक्यात 56 सक्रीय रुग्ण
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जिल्हाभरात मार्च महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने हातपाय पसरायला सुरुवात केली असून, रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ नोंदविली आहे. कोरोनाची आकडेवारी सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, 25 मार्च रोजी जिल्ह्यात एकूण 19 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या कोरोनाचे एकूण 56 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. मागील पाच दिवसांत रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. सात तालुक्यात सध्या सक्रीय रुग्ण आहेत.
रायगड जिल्ह्यात 25 मार्चपर्यर्ंतच्या अहवालानुसार, पनवेल महानगरपालिका हद्दीत 15, पनवेल ग्रामीण भागात 2, पेण 1, अलिबाग 2, सुधागड 1 अशा एकूण चार तालुक्यांत 19 नवे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या पनवेल महानगरपालिका 35, पनवेल ग्रामीण 8, उरण 4, कर्जत 1, पेण 3, अलिबाग 3, सुधागड 1, म्हसळा 1 असे एकूण 56 सक्रीय कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर, 25 मार्च रोजी मृत्यू झाल्याची नोंद नाही. या दिवशी पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून 25 मार्च पर्यंत एकूण 28 लाख 45 हजार 964 स्वॅब तपासण्या झाल्या आहेत. त्यात 2 लाख 26 हजार 403 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आतापर्यंत पनवेल महानगरपालिका हद्दीत 1424, पनवेल ग्रामीण 462, उरण 325, खालापूर 261, कर्जत 311, पेण 339, अलिबाग 641, मुरुड 111, माणगाव 141, तळा 32, रोहा 274, सुधागड 81, श्रीवर्धन 101, म्हसळा 54, महाड 185 आणि पोलादपूर 54 अशा एकूण 4 हजार 796 जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात बळी गेला आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे 48 लाख 19 हजार 314 झाले आहेत. त्यात पहिला डोस घेणारे 23 लाख 69 हजार 818, दुसरी लस घेणार 21 लाख 44 हजार 578 आणि वर्धित मात्रा घेणार 3 लाख 4 हजार 918 नागरिक आहेत.
रुग्णांमध्ये वाढ
रायगड जिल्ह्यात 20 मार्च रोजी सक्रीय रुग्ण 23 होते, तर पुढील पाच दिवसांत ही संख्या दुप्पट होऊन 56 पर्यंत पोहोचली आहे. सुदैवाने नजीकच्या काळात कोरोनाने रुग्ण मृत झाल्याची नोंद नाही. सध्या जिल्ह्यातील सक्रीय रुग्ण हे गृहविलगीकरणात राहून उपचार घेत असून, कोणाताही रुग्ण रुग्णालयात दाखल नाही.