सावधान! महाराष्ट्रावर नोरू चक्रीवादळ घोंगावणार

20 राज्यांना यलो अलर्ट जारी

। मुंबई । प्रतिनिधी ।

चीन समुद्रातील नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्री वारे वाहत आहेत. त्याचा फटका महाराष्ट्रासह 20 राज्यांना बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.6) राज्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

नोरू चक्रीवादळामुळे देशातील काही राज्यांमध्ये मान्सून अजूनही सुरू असून त्याच्या परतीला विलंब होत आहे. पश्‍चिम बंगाल, बिहार, झारखंड, सिक्कीमसह देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी यंदा मान्सून 13 ऑक्टोबरपर्यंत परतेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

20 राज्यांसाठी यलो अलर्ट
हवामान खात्याने देशातील 20 राज्यांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच या राज्यात मेघगर्जनेसह आणि जोरदार वार्‍यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्‍चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.

Exit mobile version