। पेण । प्रतिनिधी ।
शहीद भगतसिंग यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी लढा दिला आहे. त्यांचे बलिदान देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान ठरले आहे. भगतसिंग यांच्यासारख्या तरुण क्रांतिकारकांचे मानवता वादासाठी समाजवादावर आधारित क्रांतिकारी जीवन कार्य तसेच त्यांच्या लेखनाची भारत देशाला गरज आहे. त्यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. शहीद भगतसिंग यांच्या स्मरणार्थ शनिवारी (दि.23) मार्च रोजी भारतीय महिला फेडरेशन द्वारा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यावतीने शहीद दिवस हा कार्यक्रम पेणमधील महात्मा गांधी वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी जयंत पाटील बोलत होते.
यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले, भारतीय महिला फेडरेशनच्या रायगड जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गोरे यांच्या प्रयत्नातून पेणमधील घरकाम महिला कामगार यांची संघटना स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी प्रथमच भारतीय महिला फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिव लता भिसे सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय योजना, कामाचे तास, महिन्यातून दोन पगारी सुट्ट्या तसेच पेन्शन योजना यासंदर्भात शासन दरबारी आपला पाठपुरावा सुरू आहे. मोहिनी गोरे यांचे हे काम कौतुकास्पद असून, त्यांनी जिल्हा पातळीवर अशी संघटना बांधून महिला कामगारांना जो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आम्ही संपूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन आ. जयंत पाटील यांनी दिले.
कुन्नूरची राणी चेन्नम्मा यांनी ब्रिटिशांविरुद्ध सर्वप्रथम लढा दिला. या प्रेरणादायी लढ्याला आज दोनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्याचे प्रकाशन भारतीय महिला फेडरेशनच्या विचार मंचावर आ. जयंत पाटील यांच्या हस्ते जाहीरनामा प्रकाशन झाले. या कार्यक्रमाच्या वेळी कॉ. जयवंत पाटील, कॉ. जोहेकर, अतुल म्हात्रे, सुजाता पाटील, महादेव दिवेकर, राजू कोरडे उपस्थित होते.







