मौज प्रकाशनचे भागवत कालवश

। मुंबई । प्रतिनिधी ।
मौज प्रकाशनगृहाचे संचालक माधवराव भागवत यांचे शनिवारी पहाटे दीड वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शीव येथील स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी ललिता भागवत, दोन मुले आणि त्यांचा परिवार आहे.

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रकाशन व्यवसायात दर्जेदार साहित्य निर्मिती करत आपले स्थान टिकवून ठेवणार्‍या मौज प्रकाशनाचा वारसा पांडुरंग भागवत, दत्तात्रेय भागवत, विष्णुपंत भागवत, श्री. पु. भागवत यांच्यासारख्या विलक्षण प्रभावी संपादकांनंतर माधवराव भागवतांनी यशस्वीपणे सांभाळला. ते प्रामुख्याने मुद्रण तज्ज्ञ होते. मुळातच भागवत कुटुंबियांचा साहित्य आणि प्रकाशन व्यवसायातील लौकिक मोठा असल्याने माधवरावांचाही साहित्य वर्तुळातील वावर कायम राहिला.

प्रयोगशील, सर्जनशील नवे लेखक शोधून त्यांचे साहित्य मौज प्रकाशनाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली. उत्कृष्ट संपादन ही मौजेची खासियतही त्यांनी जपली. मराठी पाठ्यपुस्तक प्रकाशन वर्तुळातही त्यांचा वावर होता.

Exit mobile version