व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियम, महिंद्रा उपांत्य फेरीत

। मुंबई । प्रतिनिधी ।

शिवनेरी मंडळाने आयोजित केलेल्या स्व. मोहन नाईक चषक विशेष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियम, महिंद्रा यांनी उपांत्य फेरी गाठली. तर शिवशक्ती, डॉ.शिरोडकर या मुंबईच्या दोन संघा बरोबरच उपनगरच्या स्वराज्य संघाने साखळीत दुसरा विजय मिळवीत स्व. भागीरथीबाई सावंत चषकाच्या स्थानिक महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला.

पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारत पेट्रोलीयमने मुंबई महानगर पालिकेच्या प्रतिकार 33-19 असा संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. दुसर्‍या सामन्यात महिंद्राने न्यू इंडिया एन्सु.चे आव्हान 43-23 असे मोडून काढले.

स्थानिक महिला राज्यस्तरीय स्पर्धेच्या अ गटात मुंबईच्या शिवशक्तीने मुंबईच्याच अमरहिंदला 36-25 असे नमवित साखळीत दुसरा विजय मिळविला. ब गटात मुंबईच्या डॉ. शिरोडकरने रायगडच्या कर्नाळा स्पोर्ट्सचा 33-25 असा पाडाव करीत साखळीत दुसरा विजय नोंदविला.

Exit mobile version