भरडखोल गावची वारी पंढरपूरकडे मार्गस्थ

समुद्राचं तीर्थ होणार चंद्रभागेला समर्पित

। बोर्ली पंचतन । वार्ताहर |

गेली 39 वर्षं पंढरीच्या वारीची अखंड परंपरा जपणार्‍या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल गावच्या कोळी बांधवांची संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींची पायी आषाढी वारी शनिवारी (दि.29) सकाळी टाळ-मृदुंगाच्या तालावर विठू नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पंढरीकडे मार्गस्थ झाली.

वैशाख वणव्याची काहिली सरुन मृग नक्षत्राच्या सरी बरसू लागल्या की वारकर्‍यांना वेध लागतात ते पांडुरंगाच्या भक्तीत चिंब भिजण्याचे. यातुनच मग अवघ्या वारकर्‍यांची पावलं पंढरीची वाट चालू लागतात. भरडखोल गावची वारीही अबालवृद्धांसह पंढरीकडे मार्गस्थ होते. वारीला जाताना आपल्यासोबत नेलेलं समुद्राचं तीर्थ चंद्रभागेमधे समर्पित करुन भरडखोल पंचक्रोशीतला प्रत्येक माऊली पांडुरंगाच्या चरणी विश्‍वाच्या कल्याणाचं मागणं मागत असतो.

ठिकठिकाणच्या मुक्कामावर आपापल्या परीने वारकर्‍यांची सेवा करणारे ग्रामस्थ विठू माऊलीच्या सेवेची अनुभूती घेत असतात.भरडखोल ते पंढरपूर हे 375 किलोमीटरचं अंतर 18 दिवस ऊन-पाऊस खाच-खळग्यांची तमा न बाळगता पायी चालत पंढरीला पोहोचलेले समस्त वारकरी विठू माऊलीचं दर्शन होताच भरून पावतात. महाराष्ट्रातून विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरीत येणार्‍या दिंड्यांचा चंद्रभागेच्या तिरी रंगणारा वारीचा सोहळा म्हणजे महाराष्ट्राचं गौरवशाली, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ऐश्‍वर्य आहे. अशा या वारीचा जीवनात एकदा तरी अवश्य अनुभव घ्यावा.

Exit mobile version