सुनील तटकरेंचे राजकारण विश्वासघाताच; जाधवांचा घणाघात
| चिपळूण | प्रतिनिधी |
खासदार सुनील तटकरेंनी राष्ट्रवादी फोडली याचे काहीच नवल वाटत नाही.कारण, तटकरे कधीच विश्वासार्ह नव्हते. आम्ही पक्ष सोडला इतकंच फक्त दिसते; पण ज्या पक्षात आम्ही राहिलो त्या पक्षाचा विश्वासघात आम्ही केला नाही, अशी प्रतिक्रिया आ. भास्कर जाधव यांनी पत्रकारांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर पक्ष फोडल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, मी राष्ट्रवादीत होतो तेव्हा पक्षाचे उमेदवार पराभूत कसे होतील, हे आम्ही पाहिले नाही. तटकरेंचा राजकीय प्रवास बघितलात तर ज्या शिडीने वर जायचे त्याच शिडीवर लाथ मारायची, अशी राजकारणाची शंभर उदाहरणे देता येतील. त्यामुळे त्यांनी हे जे काही केले त्यात नवल वाटत नाही. एका बाजूला भारतीय जनता पक्षाचा विद्रूप चेहरा देशात जनतेसमोर येतोय आणि दुसऱ्या बाजूला शिंदे गटाला तुमची आता गरज संपली. तुम्हाला आता राहायचे तर राहा नाहीतर जा. ही भाजपची चाल उघड झाली, असेही त्यांनी निदर्शनास आणले.
गोगावलेंना गाजर
भाजपने शिंदे गटातील आमदारांना एक वर्षे सातत्याने मंत्री करण्याचे गाजर दाखवले; पण एकालाही मंत्री केले नाही; मात्र अजित पवारांबरोबर गेलेल्या नऊजणांना कॅबिनेट मंत्री केले. भरत गोगावले सातत्याने सांगत होते, आदिती तटकरे आम्हाला त्रास देतात. त्या आदिती तटकरे आता कॅबिनेट मंत्री झाल्या. याकडेही जाधव यानी साऱ्यांचे लक्ष वेधले.
त्यांचे भविष्य अंधारात
राजकारण काहीही असले तरी सर्वात अधांतरी व अंधःकारमय भविष्य कोणाचे असेल तर ते एकनाथराव शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे आहे. फडणवीस यांना जसे पाहिजे तसे वाकवून घेतले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीससुद्धा राज्यात राहणार की दिल्लीत जाणार? आणि दिल्लीत जो-जो गेला त्याची अवस्था काय झालीय, हे आपण पाहिले आहे. त्यामुळे शिंदे व फडणवीस हे दोघेही आता जात्यात आहेत.